प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकासमोरच मुलाचे अपहरण
अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद, अपहरणकर्त्यांकडून २ कोटींच्या खंडणीची मागणी, शहर हादरले
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये एका प्रसिद्ध बिल्डरच्या लहान मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. सिडको एन-४ परिसरातील सेंट्रल मॉलजवळ अज्ञात व्यक्तींनी मुलाचे अपहरण केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सुनील तुपे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे बंधू वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत. सुनील हे कुटुंबासह एन-४ मधील सेक्टर एफ-१ मध्ये वास्तव्यास आहेत. मंगळवारी सुनील हे दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते. तेव्हाच, चैतन्यचे अपहरण झाले आहे. अपहरण झाल्यानंतर १५ मिनिटांनी अज्ञातांनी सुनील यांना फोन करून आधी मराठी व नंतर हिंदीतून ‘बच्चा चाहिए तो २ करोड देना पडेंगे’ अशी धमकी दिली. दरम्यान सीसीटीव्हीत दिसत आहे की, चैतन्य सायकलवरून घरापासून एन-४ रस्त्याच्या दिशेने जात असताना मागून काळ्या रंगाची कार आली. त्याच्या सायकलच्या बाजूलाच अपहरणकर्त्यांनी कार उभी केली. चालकाच्या मागील बाजूने दोघे उतरले. एकाने चैतन्यला उचलून चालकाच्या डाव्या बाजूने कारमध्ये कोंबले. दुसऱ्याने सायकल चालवत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन फेकली. त्यानंतर अपहरणकर्ते चैतन्यला घेऊन हनुमान चौकाच्या दिशेने सुसाट निघून गेले. सुनील यांना कॉल केल्यानंतर अर्ध्या तासातच अपहरणकर्त्यांचा मोबाइल पाल फाट्याच्या पुढे बंद झाला. हनुमान चौक ते कामगार चौकातून सिडको चौक व पुढे जळगाव रोडच्या दिशेने हर्सल सावंगीच्या दिशेने कार गेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मुलाचे वडिल सुनील तुपे हे बिल्डर असून त्यांच्याशी संबंधित सर्व जणांनी देखील कसून चौकशी केली जात आहे. यासाठी पोलिसांनी ४ पथके स्थापन केली असून हे पथक आरोपींचा शोध घेत आहेत.