हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर जीवघेणा हल्ला
ससून रुग्णालयात गोळीबार आणि तलवारीचा थरार
पुणे दि ६ (प्रतिनिधी)- पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राहीली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ससून रुग्णालयाच्या कैदी वार्डमध्ये घुसून हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर गोळीबार आणि तलवारीने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पुण्यातील ससून रूग्णालयाच्या कैदी वॅार्डमध्ये हिंदु राष्ट्र सेना अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तुषार हंबीर हा कुख्यात गुन्हेगार असून गेले काही वर्ष तो तुरूंगात आहे मात्र काही दिवसापूर्वी त्याची तब्येत बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.घटनेच्या दिवशी रात्री नातेवाईक असल्याचं भासवून दोन जण कैदी वॅार्डमध्ये शिरले आणि हंबीर यांच्यावर गोळीबार केला आणि सोबत आणलेल्या तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी अमोल बागड यांनी विरोध केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत बागड जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. या आधीही हंबीरवर हल्ला करण्यात आला होता. तीन वर्षापुर्वी येरवडा कारागृहात कैद्यांच्या झालेल्या हाणामारीत हिंदू राष्ट्र सेनेचा संघटक आणि सराईत गुन्हेगार तुषार हंबीर गंभीर जखमी झाला होता. हंबीर हा मोहसीन शेख खूनातला आरोपी आहे. सध्या हंबीरवर उपचार सुरु आहेत.
बंडगार्डन पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे मात्र अजून हल्लेखोरांना पोलीस पकडू शकलेले नाहीत. त्याचबरोबर ससून रूग्णालयाच्या सुरक्षेच्या जबाबदारीत ही बंडगार्डन पोलीस अपयशी ठरले आहेत.