
चित्रपटात रोल देण्याच्या नावाखाली माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला गंडा
पाच कोटी घेऊन गंडा घालणारे जोडपे फरार, विक्रांत मेस्सीच्याही नावाचा समावेश, प्रकरण काय?
मुंबई – चित्रपटसृष्टीत काम करण्याची अनेकांची इच्छा असते. पण त्यातून अनेकांची फसवणूक देखील केली जाते. पण आता फसवणूक करणाऱ्यांची मजल खुप पुढे गेली आहे. चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली बड्या राजकारण्याच्या मुलीची एका प्रोड्युसर दाम्पत्याने फसवणूक केली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीने मुंबईस्थित चित्रपट निर्माती कंपनीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. चित्रपटात भूमिका देण्याच्या नावाखाली चार कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली, असा दावा निशंक यांची मुलगी आरूषी निशंक यांनी केला आहे. याबद्दल देहरादूनच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपटात भूमिका दिली जाईल, या आश्वासनानंतर आरूषी यांनी गुंतवणूक केली. मात्र नंतर त्यांना चित्रपटात भूमिका दिली गेली नाही, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आरुषी निशंक म्हणाल्या की, बागला दाम्पत्याने ते मिनी फिल्म प्रा. लि. चे दिग्दर्शक असल्याचे सांगितले. अभिनेत्री शनाया कपूर आणि विक्रांत मॅसीला घेऊन ते चित्रपट निर्माण करणार असल्याचे सांगितले. त्यांनी मला चित्रपटात भूमिका देण्याचे वचन दिले, मात्र नंतर मला पाच कोटी रूपये गुंतवणूक करण्यास सांगितले. ही गुंतवणूक केल्यास माझ्या कंपनीला २० टक्के नफा दिला जाईल, जो की १५ कोटींच्या आसपास असेल, असेही त्यांनी सांगितले. आरूषी निशंक यांच्या तक्रारीनंतर बागला दाम्पत्यावर खंडणी, फसवणूक, बोगसगिरी आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ‘आँखों की गुस्ताखियां’ चित्रपटाच्या सेटवर एक भव्य उद्घाटन समारंभ आयोजित केला. ज्याला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही उपस्थित होते.
आरुषी निशंक या अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या आहेत. आरुषी गेल्या काही वर्षांपासून हिमश्री फिल्म्सच्या माध्यमातून चित्रपट निर्माता सृष्टीत आहे. अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये आरुषीने काम देखील केले आहे. मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.