
भाजपाच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच घेतल विष
रूग्णालयात उपचार सुरू, 'त्या' व्हिडिओमुळे उडाली खळबळ, वाल्मिक कराडचाही उल्लेख
नवी मुंबई – नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांचा विष पिऊन स्वत:चा जीव संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी विष प्यायलं होतं. विषघेण्यापुर्वी बनवलेल्या व्हिडिओत त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
पोलिसांसमोर विष घेण्यापूर्वी त्यांनी कारमध्ये बसून एक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी ते म्हणाले, प्रचंड मानसिक तणावातून हे पाऊल उचलत आहे. समाजात वाल्मिक कराडसारखी प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे काम करू शकत नाही. २५ वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांप्रमाणे मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे. चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डींगचं काम सुरु केलं. रमेश आसबे, युनुस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश आसबेचं आणि सचिन घायवळ व निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहिती नाही. मात्र, अडीच-तीन वर्षे त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डींगचं काम बंद पाडले आहे. जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. एका कामात बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आगमने यांना पार्टनर म्हणून घेतलं,तेथेही त्रास झाला. नरेंद्र झुरानी प्रकरणातही असेच घडले, हे प्रकरण खूपच विचित्र आहे. मी नवी मुंबईत ज्याला लहानाचा मोठा केला, ज्याला नावारुपाला आणला, ज्याला समाजात वावरायचं शिकवलं, कामं घेऊन दिली, पैसे दिले. त्याचा हिशेब करताना एका राजकीय नेत्याच्या, कधी दुसऱ्याच्या आश्रयाला जायचं. या नरेंद्र झुरानीला दत्ता घंगाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव करण्यात आले, काहीही संबंध नसताना. त्यांना राजाश्रय दिला, व्यवसायात पार्टनर झाले. त्यांचा काय व्यवसाय आहे माहिती नाही पण कोट्यवधींच्या जमिनी ते विकत घेत आहेत. दत्ता घंगाळे यांनी मला गँगवॉरची धमकी दिली, असा आरोप जाधव यांनी केला आहे. एकंदरीत फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या भरत जाधव यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भरत जाधव यांनी २०२१ मध्येही मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. आता मी कंटाळलो, फार सहन होत नाही. माझ्यावर सतत अन्याय होत आहे.माझा छळ केला जात आहे. मी न्यायासाठी धावाधाव करत आहे, पण कुठूनही मला न्याय मिळत नाही, असे सांगत त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.