
…म्हणून नशेबाज रिक्षाचालकाचा प्रवाशाला चिरडण्याचा प्रयत्न
भयानक घटना सीसीटीव्हीत कैद, पोलीसांकडुन कारवाई करण्यास टाळाटाळ, चालक फरार
मुंबई – रिक्षा चालकांची अरेरावी आणि मनमानी नित्याची बाब बनली आहे. पण मुंबईजवळील मिरा रोड परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली. रात्रीच्या वेळी प्रवाशाला सोडल्यानंतर एका नशेबाज रिक्षाचालकाने प्रवाशासोबत भाड्यावरून वाद घालत चिरडण्याचा प्रयत्न केला आहे.
मीरा रोड परिसरात एका मद्यधुंद रिक्षाचालकाने भाड्यावरून झालेल्या वादानंतर एका प्रवाशाला अनेक वेळा चिरडण्याचा प्रयत्न केला. यात या रिक्षाचालकाचे वर्तन पाहून सर्वच संताप व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि त्यांचा मित्र दिल्लीहून मुंबईत आले होते आणि त्यांनी मुंबई विमानतळावरून एक रिक्षा भाड्याने घेतली. मीटरनुसार भाडे ५०० रुपये होते, पण मीरा रोड परिसरात आल्यानंतर रिक्षा चालकाने ८०० रूपयाची मागणी केली. जितेंद्रने जास्तीचे पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. यातूनच या रिक्षाचालकाला राग आला. रागाच्या भरात त्याने जितेंद्र यांना अनेक वेळा चिरडण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रिक्षाचालक नशेत असल्याचे सांगितले जात आहे. सीसीटीव्हीमध्ये जितेंद्रला वेगाने धावताना स्पष्टपणे दिसत आहे. रिक्षा चालक हा विमानतळावर देखील वाद घालत होता असा आरोप जितेंद्र यांनी केला आहे.
या घटनेनंतर जितेंद्रने मीरा रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासठी गेले असता तातडीने एफआयआर नोंदवण्यात आला नाही. तीन दिवसांनी अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चालक सध्या फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.