
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
सुसाईड नोटमुळे पत्नीचा काळे कृत्य समोर, प्रियकराच्या साथीने पतीचा छळ, वयाने मोठा असूनही...
नागपूर – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या विविध घटना समोर येत आहेत. अतुल सुभाषपासून सुरु झालेल्या या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता हे लोण महाराष्ट्रात देखील पोहोचले आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना नागपूर मधून समोर आली आहे.
नरेंद्र ठाकरे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे तर दुर्गेश्वरी नरेंद्र ठाकरे आणि राहुल मनोहर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी दुर्गेश्वरी ही नागपुरच्या गोधनी रेल्वे परिसरातील खान सोसायटीत वास्तव्याला होती. नरेंद्र आणि दुर्गेश्वरी यांचे मोठ्या थाटात लग्न झाले. दोघांच्या संसारात दोन मुले देखील झाली. संसार व्यवस्थित सुरु असतानाच दुर्गेश्वरीच्या आयुष्यात राहुल नावाचा युवक आला. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली. दोघेही मोबाईलवरुन एकमेकांच्या संपर्कात राहायला लागले. त्यानंतर दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. दुर्गेश्वरी सुरुवातीला राहुलला चोरून भेटत असे. नंतर राहुल तिला भेटायला घरी देखील येऊ लागला. दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण पती नरेंद्रला लागली. त्यामुळे तो पत्नीवर लक्ष ठेवायला लागला. नरेंद्र कामावर गेल्यानंतर तासाभरात घरी परत आला. त्यावेळी राहुल घरात आढळून आला. दुर्गेश्वरीने पतीला मित्र असल्याची ओळख करुन दिली. नंतर तर दोघांचे प्रेमसंबंध खुलेपणाने सुरु झाले. त्यामुळे पती नरेंद्रने तिच्याशी वाद घालून प्रेमप्रकरण बंद करण्यास सांगितले. मात्र, पत्नी प्रियकराला सोडायला तयार नव्हती. नरेंद्रने वाद घातल्यास दुर्गेश्वरी आणि राहुल नरेंद्रला मारहाण करत असत. त्यामुळे अपमानीत झालेल्या नरेंद्रने १७ फेब्रुवारीला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सुरुवातीला मानकापूर पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, नरेंद्रने आत्महत्यापूर्वी ‘सुसाईड नोट’ लिहिली होती. त्यात पत्नी व राहुल यांच्यातील अनैतिक संबंधामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला होता. ती चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली, त्यामुळे पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिठ्ठीच्या आधारे मानकापूर पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दुर्गेश्वरीला अटक केली असून राहुल मात्र फरार आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.