
‘तू माहेरीच का राहतेस? म्हणत पत्नीची गळा चिरुन हत्या
पतीने केली पत्नीची हत्या, पतीला होता 'हा' संशय, वाद मिटवायचा म्हणुन आला आणि खूनच केला
सांगली – कौटुंबिक वादातून माहेरी राहणाऱ्या पत्नीचा पतीनेच चाकूने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीत कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाखाली ही धक्कादायक घटना घडली आहे.
प्रियांका जकाप्पा चव्हाण असे तिचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका आणि जकाप्पा चव्हाण यांच्या गेली 4 महिने वाद सुरू होते. यात तू माहेरीच का राहतेस असे म्हणत तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या रागातून त्यांने हे कृत्य केल्याची माहिती आहे. प्रियांका आणि जकाप्पा यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. दोघांना एक मुलगा, एक मुलगी अशी अपत्ये आहेत. दोघेही बबलेश्वर येथे राहत होते. जकाप्पा हा रत्नागिरी जिल्ह्यात दगडाच्या खाणीवर काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. या वादातून प्रियांका ही सांगलीवाडी येथे माहेरी आली होती. याठिकाणी ती आई-भावाबरोबर ती राहत होती. तसेच टिळक चौकातील एका साडी सेंटरमध्ये ती काम करत होती. गेली चार महिने सुरू असलेला वाद संपविण्यासाठी म्हणून जकाप्पा प्रियांकाला भेटण्यासाठी सांगलीमध्ये आला. फिरण्यासाठी दोघे जण आयर्विन पुलाजवळ गेले. त्या ठिकाणी दोघांमध्ये याच कारणावरुन पुन्हा वाद झाला. या वादातून त्यांने तिच्या गळ्यावर कोयत्याने वार करत तिची हत्या केली. प्रियांका घरी आली नाही म्हणून तिची आई व भाऊ शोध घेत सांगलीत आले. त्यांनी प्रियांकाला कॉल केला, परंतु ती फोन उचलत नव्हती. त्यामुळे जकाप्पाला फोन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ लागला. त्यामुळे शोधाशोध केली असता आयर्विन पुलाखाली प्रियांकाचा मृतदेह आढळून आला. जकाप्पा दारुच्या आहेरी गेल्याने पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. तर तू माहेरी का राहतेस असे म्हणत चारित्र्यावर संशय घेत होता. याच वादातून त्याने तिची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हल्ल्यानंतर पती जकाप्पा चव्हाण हा पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी नवऱ्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.