
दारुड्यांमुळे झालेल्या अपघातात तरूणीचा दुर्देवी मृत्यू
तरुणीच्या कुटुंबाने गमावली एकमेव कमावती व्यक्ती, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर, आरोपींचे किळसवाणे कृत्य
कोलकत्ता – देशात महिला सुरक्षित नसल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत.आता एका २७ वर्षीय नृत्यांगणेचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. याला एक दारुडा जबाबदार असल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अपघातात नृत्यागंणा आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रमुख सुतंद्रा चॅटर्जी यांचा मृत्यू झाला. त्या पश्चिम बंगालच्या चंद्रनगर येथील राहणाऱ्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, एक सफेद रंगाची गाडी चॅटर्जी यांच्या गाडीच्या पुढे जात असताना धडक देते. चॅटर्जी यांच्या गाडीचा पाठलाग केला जात होता. यात हा अपघात घडला आहे. तसेच सफेद रंगाच्या गाडीत बसलेल्या लोकांनी चॅटर्जी यांच्याकडे पाहत अश्लील इशारे केले. त्या गाडीने दहा किलोमीटरपर्यंत आमच्या गाडीला अनेकदा धडक दिली. आधी ओव्हरटेक करायचे मग पुन्हा आमच्या गाडीला पुढे जाऊ द्यायचे. आम्ही त्यांच्यापासून पिच्छा सोडविण्याचा खूप प्रयत्न केला. आम्हाला भीती होती की, ते आम्हाला लुटतील, अशी माहिती सुतंद्रा चॅटर्जी यांचे सहकारी मिंडू मंडल आणि चालक राजदेव शर्मा यांनी दिली आहे. गाडीला धडक दिल्यानंतर आरोपी पसार झाले. पण चॅटर्जी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या, यातच त्यांचा मृत्यू झाला. सुतंद्र चॅटर्जी या हुगळीतील चंद्रनगर येथील रहिवासी होत्या. त्या बिहारमधील गया येथे एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवत होत्या तसेच एक डान्स ग्रुपही त्या चालवत होत्या.
सुतंद्रा चॅटर्जी या कुटुंबातील एकट्या कमावत्या व्यक्ती होत्या. सुतंद्रा यांच्या वडिलांचे कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यामुळे त्या आजारी आई आणि दोन आज्यांचा एकटीने सांभाळ करत होत्या. चॅटर्जी यांच्या आईने न्यायाची मागणी केली आहे.