
बायकोने भावाच्या मदतीने केली पतीचा गोळ्या झाडून हत्या
लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात पतीची हत्या, प्रेमविवाह होऊनही पत्नीचे धक्कादायक कृत्य, या कारणामुळे केला खून
नोएडा – उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका बँक डेटा मॅनेजरची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी धक्कादायक कारण समोर आले असून पत्नी आणि मेव्हन्यानेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
गाझियाबाद येथील बँक डेटा मॅनेजर मनजीत मिश्रा यांच्यावर शुक्रवारी ग्रेटर नोएडा येथे कामावर जात असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ही संपूर्ण घटना कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाली होती. पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर आले आहे. मनजीत आणि मेघा ठाकूर यांचे प्रेमसंबंध होते. दोघेही वेगळ्या जातीचे असल्याने दोन्ही कुटुंबाचा लग्नाला नकार होता. पण तरीही त्यांनी २०२४ मध्ये लग्न केले. पण लग्नाच्या १५ दिवसानंतर मनजीतच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. या घटनेला मेघाला जबाबदारी ठरवत तिला अपशकुनी म्हणून सासरचे लोक त्रास देऊ लागले. यामुळे घरात सतत वाद होऊ लागल्याने मनजीतने मेघाला माहेरी सोडले. यामुळे मेघाचा भाऊ सचिनने मनजीतला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मेघाने घटस्फोटासाठी अर्ज करत १ कोटी रुपयांची पोटगी मागितली. एवढी मोठी रक्कम देण्यास मनजीतने नकार दिला. त्यामुळे सचिन आणि मेघाने मनजीत हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप मनजीतच्या कुटुंबीयांनी केला आहे. सचिनने त्याच्यासोबत काम करणाऱ्या प्रवीण नावाच्या व्यक्तीला मनजीतची हत्या करण्यासाठी १५ लाख रूपयाची सुपारी दिली. यातील ५ लाख देण्यात आले होते. तर १० लाख काम झाल्यानंतर मिळणार होते. यानंतर प्रवीणने गावातील शुटर्सना बोलवून मनजीतची गोळ्या घालून हत्या केली. हल्ल्यांनंतर, मिश्राचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आलेल्या स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी मिश्राची पत्नी आणि मेहुण्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मेहुण्याला अटक करण्यात आली असून बायकोवर अजून कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, तसेच अधिक माहितीसाठी अधिकारी कारमधील डॅशबोर्ड कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहेत.