
आळंदीत जाऊन लव्ह मॅरेज करताय मग ही बातमी वाचाच!
आळंदीतील प्रेमविवाहाबाबत धक्कादायक माहिती समोर, प्रेमाच्या आणाभाका लग्नानंतर मात्र...
पुणे – प्रेमविवाह आजही आपल्या समाजात गुन्हा समजला जातो. समाज प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला सहज स्वीकारत नाहीत. पण काहीजण मात्र प्रेमविवाह करतात अशासांठी आळंदी हे हक्काचे ठिकाण बनले आहे. मुलगा आणि मुलगी सज्ञान असेल तर आळंदीत त्यांचा विवाह करुन लग्नाचे प्रमाणपत्र देखील देण्यात येते. पण आता या आळंदीतील लग्नाबाबत धक्कादायक सत्य समोर आले आहे.
देवाची आळंदी आता प्रेम विवाह करणाऱ्यांसाठी हक्काचे ठिकाण आहे. मात्र घरच्यांना न सांगता आळंदी येथे पळून जाऊन लग्न केलेल्या जोडप्याचे ६० ते ७० टक्के प्रेमविवाह अपयशी ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. लग्न आंतरजातीय असो, किंवा दुसरे- तिसरे असो किंवा कमी खर्चातले, झटपट लग्न लावून देण्याची यंत्रणा आळंदीत कार्यरत आहे. अगदी ५ हजार रुपयांत विवाह लावला जातो. पण यातील बहुतांश विवाह का तुटतात, याची कारणे आता समोर आली आहे. पुण्यातील आळंदी येथे पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी ७० टक्के जोडपी घटस्फोट घेत आहेत, ही बाब समोर आली आहे. सोलापूरच्या एका जोडप्याने सहा-सात वर्षे प्रेमसंबंधानंतर लग्न केले, पण लग्नाच्या रात्रीच मुलीने लग्न तोडण्याचा निर्णय घेतला, तसेच एका साॅफ्टवेअर इंजिनियर जोडप्याचीही अशीच कहाणी आहे. प्रेमविवाह करणाऱ्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे. नोकरी व्यवसायामध्ये कमी मोबदला, दोन्ही कुटुंबांमधील सामाजिक, आर्थिक स्थिती, सवयी, परंपरा, आदींमध्ये असणारी प्रचंड तफावत, सत्य परिस्थिती यामधील विरोधाभास, आदी कारणे पुढे येत आहेत.
प्रेम आणि संसार या एकदम वेगवेगळ्या घटना आहेत. प्रेमात चंद्र आणण्याचे वचन दिलेले अनेक प्रेमवीर घराचा किराणा भरताना धायकुतीला येतात. तर तुझ्यासोबत अर्धी भाकरी खाऊन संसार करेन म्हणणारी मुलगी घरकाम करताना रडकुंडीला येते. व्यवहारिक ज्ञानाचा अभाव हे देखील या घटस्फोटाचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.