
प्रियकर आणि त्याच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
व्हिडिओ बनवत संपवले जीवन, लग्नाचे अमिष दाखवत अत्याचार, रूग्णालयात राडा
डोंबिवली – टिटवाळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिटवाळ्यात प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. लग्नाचे आश्वासन देऊन प्रियकराने दुसरीकडे लग्न केल्यामुळे तिने हे पाऊल उचलले आहे.
सुमन मच्छिंद्र शेंडगे असं मृत महिलेचं नाव आहे. सुमन शेंडगे आणि सचिन शास्त्री हे गेल्या दहा वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. सचिन शास्त्री यांनी सुमनला लग्न करण्याचे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्याने पाच वर्षांपूर्वी गायत्रीसोबत लग्न केले. पती सचिन आणि सुमन या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती गायत्रीला समजली. त्यानंतर सचिन आणि कुटुंबियांकडून सुमनला त्रास देण्यास सुरूवात झाली. नेहमी फोन करून, तसेच प्रत्यक्ष समोर भेटून सचिन आणि त्याचे कुटुंबीय सुमनला वारंवार टार्गेट करत होते. सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळलेली सुमन मानसिकदृष्ट्या खालावून गेली होती. शेवटी तिने स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. अखेर तिने जीवनाचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. राहत्या घरात सुमनचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत छताला लटकलेला आढळून आला. आत्महत्या करण्यापूर्वी सुमनने आपल्याला झालेल्या त्रास व्हिडियोच्या माध्यमातून मांडला होता. सुमनच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने संताप व्यक्त करत तिच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या सचिन आणि कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत आरोपींना गुन्हा नोंदवून अटक केली जात नाही तोपर्यंत सुमनचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिला होता.
या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी प्रियकर सचिन शास्त्रीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची हमी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली असून तपास सुरु केला आहे.