
म्हणून प्रियकराने केली प्रेयसीची चाकून वार करुन हत्या
ऎश्वर्याच्या आईचे ते वाक्य आणि प्रशांतने उचलले टोकाचे पाऊल,स्वतःही केली आत्महत्या
बेळगाव – प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला करूत तिचा खून करून स्वतही आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
ऐश्वर्या लोहार असे मयत तरुणीचे नाव आहे. तर तिच्या प्रियकराचे नाव प्रशांत कुंडेकर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत आणि ऐश्वर्या यांचे गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू होतं. पण मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद सुरू होता. प्रशांतने मंगळवारी दुपारी ऐश्वर्या हिला खासबाग सर्कल जवळील ओळखीच्या घरात बोलावून घेतले. यावेळी त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. त्यामुळे संतापलेल्या प्रशांतने धारदार चाकूने ऐश्वर्यावर हल्ला केला. चाकूचा वार वर्मी लागल्याने ती घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि यातच तिचा मृत्यू झाला.ऐश्वर्याची हत्या केल्यानंतर प्रशांतनेही चाकूने स्वतःवर वार करून घेतले. अतिप्रमाणात रक्त स्त्रावर झाल्यामुळे त्याचाही तिथेच मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे प्रशांतने ऎश्वर्याच्या आईकडे लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिच्या आईने ‘चांगले काम करून चांगली कमाई कर, त्यानंतरच लग्न लावून देऊ,’ असे सांगितले होते. त्यातूनच ही हत्या झाली असावी, अशी शक्यता आहे. दरम्यान सायंकाळी जेव्हा घरातील मंडळी घरी परतली तेव्हा दार उघडून घरात प्रवेश करताच खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ऐश्वर्या आणि प्रशांतचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून घरच्या लोकांना तातडीने घटनेची माहिती शहापूर पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाला पाठविण्यात आले आहेत. घरात विषाची कुपीही आढळून आली आहे. त्यामुळे विष घेतले की नाही, हे उत्तरीय तपासणी केल्यानंतरच उलगडा होणार आहे, पोलीस तपास सुरु आहे.