
रिमोटवरुन वाद झाल्याने महिला साॅफ्टवेअर इंजिनियरची आत्महत्या
महिलेच्या आईचा खळबळजनक आरोप, पतीविरोधात गुन्हा दाखल म्हणाली, तो माझ्या लेकीला..
हैद्राबाद – हैद्राबादमध्ये एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देविकाने २ मार्चच्या रात्री राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
देविका असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देविका आणि सतीश एकाच सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. दोघेही एकमेकांना २ वर्षांपासून ओळखत होते. त्यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये गोव्यात थाटामाटात लग्न केलं होते. घटनेच्या दिवशी म्हणजे २ मार्चच्या रात्री पती-पत्नीमध्ये टीव्हीच्या रिमोटवरून वाद झाला, त्यानंतर पती घरातून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आला तेव्हा त्याला त्याची पत्नी मृतावस्थेत आढळली. यानंतर पत्नीने गळफास घेतल्याची माहिती त्याने पोलिसांना आणि कुटुंबीयांना दिली. या घटनेनंतर देविकाच्या आईने एफआयआर दाखल केला. जावई सतीश लग्नापासूनच देविकाला हुंड्यासाठी त्रास देत होता. या गोष्टीला कंटाळून लेकीने आत्महत्या केली, असा आरोप देविकाच्या आईने केला आहे. देविकाचा पती हुंड्यासाठी तिचा छळ करायचा. तिला शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. आणखी सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली, असाही आरोप आईने केला आहे.
रायदुर्गम पोलिसांनी पती सतीशविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. देविकाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम उस्मानिया हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे.