
बिबट्याने नाही तर पुतण्यानेच केली चुलतीची हत्या
महिलेच्या हत्येचे गुढ उकलले, अनैतिक संबंधातून पुतण्यानेच दिली हत्येची सुपारी, असा रचला कट
दाैंड – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण या ठिकाणी लता धावडे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, या महिलेचा खून झाल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
लताबाई बबन धावडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. लता धावडे या बिबट्याच्या हल्ल्यात नाही, तर पुतण्यानेच दगडाने ठेचून हत्या केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी तीनच्या सुमारास वरवंड हद्दीतील दादा दिवेकर यांच्या शेतात लताबाई यांचा मृतदेह आढळून आला होता. छिन्नविछिन्न स्वरुपात हा मृतदेह आढळल्याने त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यामुळे लताबाई धावडे यांचे घेतलेले नमुने नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासण्यात आले. यातून हा हल्ला वन्य प्राण्याने केला नसल्याचं निष्पन्न झालं. तसेच त्यांचा खून झाल्याचा अहवाल या प्रयोगशाळेनं दिला. तोंड व डोके दगडाने ठेचून हत्या केल्याचं अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार पोलीसांनी तपास केला असता अनिल पोपट धावडे आणि त्याची चुलती लता धावडे यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचे सत्य समोर आले. पण अलीकडे लता धावडे या अनिलला भेटत नव्हत्या तसेच त्याच्याकडून पैशाची मागणी करत होत्या. त्यामुळे अनिलने सतीलाल वाल्मीक मोरे याला लता यांचा खून करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानेच लता धावडे यांचा खून केल्याचे समोर आले आहे.
आरोपींनी वनविभागाकडे नुकसान भरपाईसाठी लाखो रुपयांची मागणी केली होती. यानंतर उपसरपंच असलेला पुतण्या अनिल धावडे आणि शेतमजूर सतीलाल मोरे यांनीच अनैतिक संबंधातून लताबाई धावडे यांचा खून केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.