
कॅन्टिनमध्येच उपप्राचार्य आणि प्राध्यापकामध्ये हाणामारी
महाराष्ट्रातील नावाजलेल्या महाविद्यालयातील व्हिडीओ व्हायरल, लाथा बुक्यांनी एकमेकांची जोरदार धुलाई
परभणी – परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील जनाबाई महाविद्यालयात दोन प्राध्यापकांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा सुरू असून नावाजलेल्या महाविद्यालयात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महिला शिक्षकामध्ये हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण आता परभणीतील प्राचार्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे आणि प्रा. लड्डा यांच्यात कॅन्टिनमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या इतर प्राध्यापकांनी दोघांनाही आवरण्याचा प्रयत्न केला पण दोघेही थांबले नाहीत. विशेष म्हणजे ही घटना ५ मार्चला घडली होती. पण त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या हाणामारीचा व्हिडीओही उपस्थित विद्यार्थ्यांनी चित्रित केला असून तो समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे महाविद्यालय आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एम.धूत यांनी गुरुवारी संबंधित उपप्राचार्य व प्राध्यापकास २४ तासाच्या आत खुलासा देण्याची लेखी आदेश दिले आहेत. संस्थेचे सचिव ॲड. संतोष मुंढे यांनी या प्रकरणात कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आपल्याकडे जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण आहे. पण ५३ वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेल्या आणि नॅक ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या या महाविद्यालयात असा प्रकार घडल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.