Latest Marathi News
Ganesh J GIF

मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, तु ‘टॉप’ काढून मसाज कर

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणार्‍या तिघांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे – धनकवडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी गोळा करणार्‍या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.

रोहित गुरुदत्त वाघमारे, शुभम चांगदेव धनवटे, राहुल ज्ञानेश्वर वाघमारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ फेब्रुवारी रोजी घडला होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित वाघमारे हा एका मित्राला घेऊन धनकवडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने शर्ट काढून खुंटीला टांगून ठेवताना खिशामध्ये मोबाईल चालू ठेवला होता. मसाज करत असताना रोहित वाघमारे याने या महिलेला अंगावरील टॉप काढण्यास सांगितले. त्यांनी त्यास नकार दिल्यावर मी सांगितले तसे केले नाहीस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन, असे सांगून जबरदस्तीने त्यांना टॉप काढायला लावून उपचार करुन घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने २ ते ३ जण तो घेऊन आला. त्याने फिर्यादी महिलेला मसाज करताना नकळत काढलेला व्हिडिओ दाखवून २० हजार रुपये दे, नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर काऊंटरमध्ये असलेले ८०० रुपये जबरदस्तीने घेऊन ते निघून गेले. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात आरोपी वारजे माळवाडी भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोेलिसांच्या पथकाने तिघांना सापळा लावून पकडले. आरोपींनी अशा पद्धतीने शहरातील सात ते आठ मसाज पार्लरमध्ये शिरून खंडणी उकळण्याचे गुन्हे केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

न्यायालयाने आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रोहित वाघमारे याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तसेच रोहित व शुभम धनवटे यांच्याविरुद्ध बीडमधील अंभोरा पोलीस ठाण्यात तसेच पाथर्डी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हे दाखल आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!