
भररस्त्यात तरूणाला नग्न करत बेदम मारहाण
मारहाणीची घटना व्हिडिओत कैद, तरुणाची प्रकृती गंभीर, आरोपी फरार, महाराष्ट्रात अराजक
लातूर – बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा अत्याचाराचे आणि अमानुष मारहाणीचे व्हिडिओ समोर येत आहेत. बीडमधील हे लोन आता लातूरमध्ये पोहोचले असून एका टोळक्याने भररस्त्यात तरुणाला बेदम मारहाण केली आहे.
बीड, जालना यानंतर आता लातूरमध्ये तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तरुणाला नग्न करुन मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये सहा ते सात तरुण एका तरुणाला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या एका बारच्या पुढे हा थरार सुरू होता. याच ठिकाणी असलेल्या राजश्री बार आणि क्लबमध्ये काही तरुणांचा वाद झाला होता. रस्त्यावर टोळक्याने तरुणाला नग्न करुन मारहाण केली. एवढेच नाहीतर युवकाच्या डोक्यात दगड घालून तसेच त्याचे कपडे काढून अमानुष मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. युवकाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. युवकावर हल्ला करून आरोपी फरार झाले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत, अशी माहिती लातूर पोलिसांनी दिली आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी जखमी तरुणाला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये नक्की चाललं तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.