
प्रेम प्रकरणाच्या संशयातून बीडमध्ये तरुणाची हत्या
दोन दिवस डांबून जबर मारहाण, संतोष देशमुख घटनेची पुनरावृत्ती, बीडमध्ये चाललयं काय?
बीड – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने महाराष्ट्रातच नाही तर देशभरात खळबळ उडाली. त्यातच आता आष्टी तालुक्यात आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
विकास बनसोडे (रा.जालना) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे एका ट्रक मालकाने ट्रक चालकाला दोन दिवस डांबून ठेवत मारहाण केली. ही मारहाण इतकी निर्घृणपणे केली की यात त्या चालकाचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात आष्टी पोलिसांनी या मालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. बीडमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास बनसोडे कामाला होता. क्षीरसागर यांच्या मुलीसोबत विकासचे प्रेम प्रकरण होते. घराच्या मागील शेतात आपल्या मुलीबरोबर विकास दिसल्याने भाऊसाहेब क्षीरसागर संतप्त झाले होते. त्यांनी विकासला एका खोलीमध्ये डांबून ठेवत दोन दिवस बेदम मारहाण केली. विकासचा मृत्यू झाल्याचे कळतात कडा चौकीला कळविण्यात आले. शवविच्छेदनासाठी विकासचा मृतदेह कडा येथील प्रथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला. विकासची हत्या करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीला आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासच्या जालन्यातील घरी फोन केला. आणि तातडीने बीडला येण्यास सांगितलं. यावेळी बोलताना विकासची आई त्याला मारहाण करू नका अशी विनंती करीत होती. यांचं संभाषणही समोर आलं आहे.