
अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केली पत्नीची हत्या
चिमुकल्या मुलावरही हल्ला, पोलीसांनी पतीला ठोकल्या बेड्या, संसाराचा रक्तरंजित शेवट
जळगाव – जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दहा वर्षीय मुलगाही गंभीर जखमी झाला आहे.
हनुमंतखेडा येथील रहिवासी सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे हा पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर चारित्र्यावरुन संशय घेत असे. तिचे बाहेर अनैतिक संबंध सुरू आहेत. असा संशय नवऱ्याला होता. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. यात तो तिला मारहाण करत असे. पण एकेदिवशी त्याने रात्री पत्नीची हत्या करण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी सोमवारी पहाटे सुमारे २.४५ वाजता त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून तिचा खून केला. तसेच, त्याने आपल्या दहा वर्षीय मुलगा सिध्दू सोमनाथ सोनवणे याच्यावरही हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेनंतर महिलेला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर मृत महिलेच्या भावाने पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. भावाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी सोमनाथला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राज्यात सध्या कौटुंबिक वादातून खून होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून संसार उद्ध्वस्त होत जात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक संतोष पवार आणि हवालदार राजू पाटील करत आहेत.