
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचे लग्नच झाले नाही
धनंजय मुंडे करुणा मुंडे पोटगी प्रकरणात नवीन ट्विस्ट, पण कोर्टाच्या या प्रश्नामुळे धनंजय मुंडे अडचणीत
मुंबई – अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांच्यात वाद सुरू आहे. धनंजय मुंडे माझे पती असल्याचा दावा करुणा शर्मा यांच्याकडून सातत्याने केला जातोय. पण आता कोर्टात मुंडे यांच्या वकिलाने मोठी माहिती सादर केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला २ लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. सुनावणीच्या वेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी खळबळजनक युक्तीवाद केला आहे. करुणा शर्मा यांच्यापासून झालेल्या दोन्ही मुलांची आपण जबाबदारी स्विकारतो. पण करुणा शर्मा यांच्यासोबत आपण लग्न केलं नाही, असा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. यामुळे करुणा शर्मा पोटगी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, यातूनच ही दोन मुलं झाली. मात्र त्यांनी कधीही एकमेकांशी लग्न केलं नाही, असं युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला आहे. यावेळी धनंजय मुंडेंच्या वकिलांनी उत्पन्नाबद्दल भाष्य केले. करुणा मुंडे यांना १५ लाखाच्या जवळपास वर्षाला इन्कम आहे, त्या इन्कम टॅक्स भरतात. त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे. करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यांना माझ्या पैशांची गरज नाही. त्या स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करत आहेत, असे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.
धनंजय मुंडे यांनाच कोर्टाने फटकारले आहे. “मुले तुमची मग करुणा मुंडे आई कशा नाहीत? त्या मुलांचे वडील कोण? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे. दरम्यान या प्रकरणी आता पुढील सुनावणी एप्रिलमध्ये होणार आहे.