
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी मला ५० कोटींची ऑफर
निलंबित पोलीस निरीक्षकाचा दावा, व्हिडिओ व्हायरल करत फडणवीसांवरही केले गंभीर आरोप
बीड – मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या बोगस एन्काऊंटरसाठी ५० कोटी रुपयांची ऑफर मला देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा बीडचे निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
रणजीत कासले हे काही दिवसांपूर्वी बीडच्या सायबर विभागात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र काही कारणास्तव त्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले. निलंबनानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकामागून एक गंभीर आरोप करत खळबळ उडवली आहे, आतादेखील त्यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे. रणजीत कासले यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये सांगितले की, “मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती. मला सांगण्यात आलं की, तुला १०कोटी, २० कोटी, अगदी ५० कोटींपर्यंत पैसे दिले जातील. मी स्पष्ट शब्दांत सांगितलं – हे पाप माझ्याकडून होणार नाही.” त्यांच्या या विधानावरून गंभीर स्वरूपाच्या गैरकृत्यांची आणि पोलीस खात्यातील संभाव्य गैरव्यवस्थेची शंका निर्माण झाली आहे. कासले यांचा दावा आहे की, अशा बनावट एन्काऊंटरसाठी पोलिसांना निवडून खास बैठका घेतल्या जातात. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही सामील असतात, असा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर पोलिसांची चार लोकांची टीम बनवली जाते – एक अधिकारी, दोन अंमलदार, एक हवालदार. ही टीम घटनास्थळी पाठवली जाते. प्रत्येकाला काही कोटी रुपयांची लम्पसम ऑफर दिली जाते,” असा दावाही कासले यांनी केला आहे. पण ही आॅफर कोणी दिली होती, याबाबत मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही, त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासासाठी ते परवानगी न घेता परराज्यात गेले होते, त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.