
प्रेम विवाह केलेल्या गर्भवती मुलीचा वडिलांनी केला खुन
नराधम बापाने गोळ्या घातल्या, जावयावरही गोळीबार, जमावाची वडिलांना मारहाण, महाराष्ट्र हादरला
जळगाव – चोपडा शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह करणाऱ्या मुलीला आणि तिच्या पतीला वडिलांनी गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक म्हणजे यावेळी मुलगी गर्भवती होती.
तृप्ती वाघ असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे, तर अविनाश वाघ असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. तृप्तीचे वडील किरण मांगले निवृत्त सीआरपीएफ जवान आहेत. त्यांनीच ही हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती वाघ आणि अविनाश वाघ यांनी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता, जो तृप्तीच्या वडिलांना मान्य नव्हता. त्यामुळे ते तृप्ती आणि अविनाशवर नाराज होते. तृप्ती आणि अविनाश दोघेही पुण्यात राहत होते. अविनाशच्या बहिणीचे लग्न असल्यामुळे ते चोपडाला आले होते. ते तृप्तीच्या वडिलांना कळताच किरण मांगले तिथे आले. त्यांनी आपल्या लायसन्स असलेल्या बंदुकीतून तृप्ती तसेच जावई अविनाश यांच्यावर गोळीबार केला. यात तृप्ती जागीच ठार झाली तर अविनाश याला कमरेत गोळी शिरल्याने तो गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित संतप्त वऱ्हाडी ग्रामस्थांनी तृप्तीचे वडील किरण मांगले याला बेदम मारहाण केली. मुलीने कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न केल्याचा राग किरण मांगलेच्या मनात होता. त्यामुळे तृप्तीचे वडील किरण मांगले हे तृप्तीला तसेच तिच्या सासरच्यांना कायम त्रास देत होते. विशेष म्हणजे एकदा तर किरण मांगलेने तृप्तीचा एकदा गर्भपातही केला होता. या वादामुळे तृप्ती परत माहेरी गेली नाही. अशी माहिती तिची सासू प्रियंका वाघ यांनी दिली. तृप्ती ही चार महिन्याची गर्भवती होती. आणि त्याचवेळी ही घटना घडल्याने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. पुरोगामी असे बिरूद असलेल्या महाराष्ट्रात आॅनर किलिंगची घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपी अर्जुन मांगले याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे. ही घटना घडल्यानंतर ठरलेला विवाहसोहळा अत्यंत साधेपणाने पार पाडण्यात आला आहे. ज्या ठिकाणी लग्नाचा आनंद होता, त्याच ठिकाणी शोकाकुल वातावरण तयार झाले होते.