
उपमुख्यमंत्र्यांची बहिण असल्याचे सांगत घातला २० कोटींचा गंडा
ईडीने तोतया बहिण ऎश्वर्याला ठोकल्या बेड्या, व्यावसायिक उद्योगपतींना फसवले, कोण आहे ऎश्वर्या?
बेंगलोर – सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने बंगळुरूमध्ये ऐश्वर्या गौडा नावाच्या महिलेची अटक केली आहे. कर्नाटकमध्ये श्रीमंत व्यक्तींना फसवल्याचा आरोप ऐश्वर्यावर आहे. गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याचे आश्वासन देत लोकांची २० कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप ऐश्वर्यावर आहे.
गेल्यावर्षी बंगळूर पोलिसांनी फसवणुकीच्या चार प्रकरणांमध्ये ऐश्वर्या गौडावर गुन्हा दाखल केला आहे. ऐश्वर्याने स्वतःला काँग्रेस नेते डी.के. सुरेश व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची बहीण असल्याचे सांगून श्रीमंत डॉक्टर व व्यापाऱ्यांशी जवळीक निर्माण करत त्यांना गंडा घातला आहे. तिने पोलिसांमार्फत वनिता ऐथल यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड मिळवले. वनिता या एका ज्वेलरी स्टोअरच्या मालक आहेत. त्यांनी ऐश्वर्यावर ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. वनिता म्हणाल्या की, ऐश्वर्याने त्यांना जास्त परताव्याचे आमिष दाखवले होते, परंतु नंतर विश्वासघात केला. ज्वेलरी व्यावसायिकांबरोबरच, ऐश्वर्याने दोन डॉक्टर, एक प्रसुतीतज्ज्ञ आणि एका व्यापाऱ्याच्या कुटुंबाला देखील गंडवले. हे डॉक्टर प्लास्टिक सर्जरी सेंटर चालवतात. ऐश्वर्याने स्वतःला एक श्रीमंत रिअल इस्टेट डीलर म्हणून भासवले होते. त्यामुळे ती डॉक्टर, व्यापारी आणि नेत्यांपर्यंत पोहोचली. उत्तर बंगळुरूमधील एका लक्झरी हॉटेलमध्ये तिने व्हीआयपी रूम घेतली, स्वतःच्या श्रीमंतीचा दिखावा करण्याचा ती वारंवार प्रयत्न करीत होती. पोलिसांनी सांगितले की, तिच्याकडे बॉडीगार्ड्स आणि महागड्या कारचा ताफाही होता. ऎश्वर्याला न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील चौकशीसाठी दोन आठवड्यांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे.
कॉंग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्याशी देखील तिचे संबंध असल्याचा आरोप आहे. त्यांच्यासोबत तिचे फोटो आहेत. त्यांना तिने कार दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या घरावर देखील ईडीने छापेमारी केली आहे. मात्र कुलकर्णी यांनी हे आरोप फोटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, ईडीकडून त्यांच्यावर वेगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करत आहे. गेल्या एक महिन्यापासून त्यांना त्रास दिला जात आहे. माझं राजकीय करिअर संपवण्याचा यामागे हेतू आहे. असं ते म्हणाले आहेत.