
शिवराज दिवटेच्या मित्रांची समाधान मुंडेला बेदम मारहाण
समाधानच्या मारहाणीचा बदला म्हणून शिवराजला मारहाण, परळीतील मारहाण प्रकरणात ट्विट, आरोपी अटकेत
बीड – बीडमधील परळीच्या टोकवाडी परिसरातील शिवराज दिवटे याला दोन दिवसापूर्वी अमानुष मारहाण झाली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सात आरोपीला अटक केली आहे. पण आता या प्रकरणात आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात शिवराजच्या मित्रांनी काही जणांना मारहाण केली आहे.
शिवराज दिवटे याच्या मित्रांनी परळी शहरातील समाधान मुंडे याला मारहाण केली होती. १६ मेला ही मारहाण झाली. त्यानंतर समाधान मुंडे याच्या मित्रांनी मिळून शिवराज दिवटे याला टोकवाडी परिसरात अमानुष मारहाण केली. आता दोन्ही घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शिवराज नारायण दिवटे याच्या मारहाण प्रकरणी पोलीसांनी सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहण वाघुळकर, अदित्य गित्ते, तुकाराम उर्फ रुषीकेश गिरी यासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील पाच आरोपींना २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुणावण्यात आली आहे. रोहित मुंडे, प्रशांत कांबळे, सुरज मुंडे आणि स्वराज गित्ते यांच्यासह अनोखळी दहा आरोपी फरार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिवराज दिवटे याची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात भेट घेतली. दिवटे याची भेट घेऊन ते त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. भेटीदरम्यान शिवराज दिवटे यांच्या कुटुबीयांशी चर्चा जरांगे पाटील यांनी केली. धनंजय देशमुख देखील यावेळी उपस्थित होते. आज सकाळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील शिवराज दिवटे याची भेट घेतली होती. पण आता नवीन व्हिडीओ समोर आल्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी उद्या म्हणजेच सोमवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. उद्याचा बंद हा शांततेत होणारा असून हा बंद कोणा एकाचा नाही. शांतता प्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला आहे. शांततेच्या मार्गाने शिवराज दिवटे याला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे, अशी माहिती मराठा आंदोलकांनी दिली आहे.