
सिद्धांत शिरसाट अत्याचार प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट
महिलेने केला धक्कादायक दावा, शिरसाट यांच्यावर शारिरिक आणि मानसिक शोषणाचे आरोप आता....
छ. संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका महिलेने शारिरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पण आता या प्रकरणात एक ट्विस्ट आला असून महिलेने खळबळजनक विधान केले आहे.
जान्हवी सिद्धांत शिरसाट नामक महिलेने छत्रपती संभाजीनगरचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये सिद्धांत यांच्याविरुद्ध मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र हे आरोप आता त्या महिलेने मागे घेतले आहेत. संबंधित महिलने आरोप मागे घेताना हे आपलं घरघुती प्रकरण असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, असेही महिलेने म्हटले आहे. महिलेने म्हटले की, ‘संजय शिरसाट यांचा मी सन्मान करते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले मी आरोप मागे घेते. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन कुणीही राजकारण करू नये. या प्रकरणाला मी फुल स्टॉप देत आहे. माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन कुणीही राजकारण करू नये. सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार असा इशारा या महिलेने दिला आहे. मी संजय शिरसाट यांच्यासोबत आहे. त्यांनी मला आजपर्यंत त्रास दिलेला नाही. मला त्यांच्यापासून कोणताही दबाव नाही. त्यांच्या मुलाचा आणि माझा मॅटर होता. तो पर्सनल होता. हे आमचं घरगुती प्रकरण होतं. हे वेगळंच होतं. हा विषय मी इथे संपलेला आहे. पण लोकं वाढवत आहेत. मीडिया बातम्या करत आहेत. पण मी कुणलाही सांगितलं नाही. मी आज मीडियाला मुलाखत देत कळवत आहे की, मला हे प्रकरण वाढवायचं नाही”, असं महिलेने स्पष्ट केलं आहे. महिलेने माघार का घेतली याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. तरी काल दिवसभर हा विषय चांगलाच गाजला होता.
संबंधित महिलेने २० डिसेंबर २०२४ रोजी शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, या तक्रारीवर पोलिसांकडून काहीच कारवाई झाली नाही. सिद्धांत यांचे वडील मंत्री असल्याने प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप शिरसाट यांच्या मुलाला पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसीत करण्यात आला होता. पण आता त्या महिलेनेच माघार घेतली आहे.