
सुंदर का दिसते म्हणत तरुणीच्या चेहऱ्यावर फेकले अॅसिड
तरूणीचा चेहरा पन्नास टक्के भाजला, मैत्रीणीबाबत तपासात धक्कादायक खुलासा, प्रेमाचा त्रिकोणही कारणीभूत?
जबलपूर – मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मैत्रिणीने आपल्याच जिवलग मैत्रिणीवर ॲसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामागचे कारण वाचून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
श्रद्धा दास असे अॅसिड हल्ला झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर इशिता साहू असे हल्ला करणाऱ्या तरूणीचे नाव आहे. कमाल म्हणजे दोघीही एकमेकांच्या जीवलग मैत्रीणी होत्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीबीए शिकत असलेली श्रद्धा दास आणि अभियांत्रिकीची विद्यार्थिनी असलेली इशिता साहू या दोघी एकेमकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. श्रद्धा दास ही दिसायला अतिशय सुंदर होती, तिला नुकतीच नोकरी लागली होती. तिच्याकडे महागडा फोन आणि आलिशान जीवनशैली होती. हे सर्व पाहून इशिताच्या मनात श्रद्धाविषयी आकस निर्माण झाली. त्यात भर म्हणजे इशिता आणि श्रद्धा एकाच मुलावर प्रेम करु लागल्या. पण श्रद्धा सुंदर दिसते, त्यामुळे तो मुलगा आपल्यावर प्रेम करणार नाही, याची चिंता इशिताला सतावू लागली. यातूनच इशिताने श्रद्धाला धडा शिकवण्याचा कट रचला. तिने यासाठी अँसिड हल्ला करण्याचे ठरवले. इशिताने अंश शर्मा याच्या मदतीने कॉलेजच्या बनावट लेटरहेड आणि कॉलेजच्या शिक्क्याचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार केली. आणि अॅसिड विकत घेतले. त्यानंतर श्रद्धाला सरप्राईज असल्याचे सांगत बाहेर फिरायला घेऊन आली. त्याठिकाणी गेल्यावर एका जारमधून ॲसिड काढून तिच्या चेहऱ्यावर फेकले. यात श्रद्धाचा सुमारे ५०% चेहरा भाजला असून, तिला गंभीर अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान इशिता ही मानसिक दृष्ट्या कमकुवत असून तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. इशिताने आईलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी इशिता साहू आणि तिचा सहकारी अंश शर्मा यांना अटक केली आहे. याप्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. तसेच त्या तरुणाचाही शोध पोलीस घेत आहेत.