
पुण्यात कुरीअर बाॅयच्या वेशात आलेल्या नराधमाचा तरुणीवर बलात्कार
स्प्रे मारत बेशुद्ध करत तोडले शरीराचे लचके, बलात्कारानंतर सेल्फी काढत लिहिले मी पुन्हा येईन!
पुणे – पुणे शहरातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोंढवा परिसरात बुधवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी ठरली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर एका अज्ञात इसमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत प्रवेश मिळवला आणि तोंडावर केमिकल स्प्रे करत पीडितेवर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे आरोपीने तरूणीचा मोबाईल देखील वापरल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोल्याची असणारी तरुणी जाॅबमुळे पुण्यात आपल्या भावासोबत राहत होती. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील एका कंपनीत काम करते. आरोपीने अतिशय योजनाबद्ध पद्धतीने हा सर्व कट रचला होता. आरोपीने बँकेचं कुरिअर असल्याचं सांगून दरवाज्याशी बोलणी केली आणि सहीची जबाबदारी असल्याचं सांगून सेफ्टी डोअर उघडायला लावले. तरूणीने सेफ्टी डोअर उघडताच त्याने तिच्यावर स्प्रे मारून बेशुद्ध केले. आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता, त्याने पीडितेच्या मोबाईलमधून सेल्फी काढला आणि “मजा आली मी पुन्हा येईन” असा मजकूर लिहून ठेवून निघून गेला. ही घटना घडली तेंव्हा तिचा भाऊ काही कामानिमित्त गावाला गेला होता. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा बलात्कार करण्यात आला आहे. तरुणी ज्या सोसायटीत राहते, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रवेश नोंदणीची सोय असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु, आरोपीने या यंत्रणांना चकवा देत परिसरात प्रवेश कसा केला याबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोंढवा पोलिसांनी घटनेच्या तपासासाठी १० विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सध्या मानसिक धक्क्यात असून तिच्या जबाबासाठी महिला अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डेटा आणि फिंगरप्रिंट्सवरून आरोपीचा माग काढण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे पुणे शहरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.