
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात तरुणांमध्ये जोरदार राडा
टोळक्याकडून विद्यार्थीला बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, वासा घेतला आणि डोक्यात....
पुणे – पुण्यातील नामांकित महाविद्यालयात निकाल पाहण्याच्या वादातून विद्यार्थ्यावर गंभीर हल्ला करण्यात आला. १० ते १५ विद्यार्थ्यांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मारहाणीची घटना कॉलेजच्या परीसरात घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. वादाचे कारण किरकोळ असतानाही त्याचे रूप हिंसक हाणामारीत झाले. इरफान मोहम्मद हुसेन करणूल यांनी पुण्याच्या लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाचा आपल्या मित्राच्या नावाची कॉलेज लिस्टमध्ये नोंद आहे का, हे पाहण्यासाठी कॉलेजमध्ये गेला होता. लिस्ट पाहताना दुसऱ्या विद्यार्थ्याचा धक्का लागल्यामुळे बाचाबाची झाली. यानंतर बाहेर आल्यावर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर संबंधित आरोपी विद्यार्थ्याने १० ते १५ साथीदारांना बोलावून फिर्यादीच्या भाच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एका आरोपीने रस्त्यावर पडलेला वासा उचलून सात ते आठ वेळा विद्यार्थ्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने तात्काळ हस्तक्षेप करून वासा काढून घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला. जखमी विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवत त्याच्या मामाला फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यावेळी मामाने घटनास्थळीत धाव घेत भाच्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू असून आरोपी विद्यार्थ्यांना विरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी पथक स्थापन करण्यात आले आहे.
पुणे शहरात गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. दोन दिवसापूर्वी एका सोन्याच्या दुकानावर दिवसा दरोडा पडला होता. त्यानंतर काल तरुणीवर घरात घुसून बलात्कार केला होता. त्याचबरोबर किरकोळ वादाच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता पुन्हा या घटनेने खळबळ उडाली आहे.