
टेनिसपटू राधिका यादवची वडिलांनीच केली निर्घुण हत्या
हत्येमागचे धक्कादायक कारण समोर, 'यामुळे' राधिकाचे वडील होते नाराज, राधिका, अकॅडमी, वडील...
गुरुग्राम – गुरूग्राम येथील राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राधिकाच्या वडिलांनीच हरियाणाच्या गुरुग्राम येथे राहत्या घराती ही हत्या केल्याचे समोर आले आहे. या हत्येमुळे खळबळ उडाली आहे.
टेनिस खेळाडू राधिका यादव तिच्या कुटुंबासह येथील सेक्टर ५७ मधील पहिल्या मजल्यावर राहत होती. गुरुवारी सकाळच्या सुमारास तीन वेळा गोळ्या झाडल्यानंतर, राधिकाला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोशल मीडियावर रील बनवल्याबद्दल वडील राधिकावर रागावले होते. ज्यामुळे तिला गोळ्या झाडून मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राधिका ही एक प्रसिद्ध राज्यस्तरीय खेळाडू होती. तिने अनेक पदके जिंकली होती. ती एक टेनिस अकादमी देखील चालवत होती, जिथे ती इतर मुलांना टेनिस शिकवत होती. पोलिसांनी सांगितलं की, ‘राधिका यादव ही एक राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू होती. तिने या खेळात अनेक मेडल सुद्धा जिंकले. काही महिन्यांपूर्वी तिच्या खांद्याला दुखापत झाली, ज्यामुळे तिने खेळणं बंद केलं होतं. खेळ सोडल्यावर राधिकाने वजीराबाद गावात लहान मुलांना टेनिस खेळ शिकवण्यासाठी एक अकॅडमी सुरु केली. टेनिस सामन्या दरम्यान राधिकाच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे ती मैदानात लवकर जाता येणार नव्हंत. त्यामुळे घरात कुठून तरी पैसे यावे यासाठी तिने अकादमी उघडण्याचा निर्णय घेतला. या अकादमीच्या पैशातून घरखर्च भागवता येईल असा तिचा विचार होता. पण राधिकाचे वडील याच्या विरोधात होते. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे.
२३ मार्च २००० साली जन्मलेली राधिका ही टेनिसपटू होती आणि तिची इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनमध्ये दुहेरी टेनिस खेळाडू म्हणून ११३वी रँक होती. आयटीएफ डबल्समध्ये देखील टॉप दोनशे खेळाडूंमध्ये तिचा क्रमांक होता. महिला दुहेरी प्रकारात ती हरियाणात पाचव्या स्थानावर होती. राधिका यादव ही तिच्या बरोबरीच्या खेळाडूंपैकी ‘टॉप प्लेयर’ म्हणून ओळख निर्माण करत होती.