
उपसरपंचाला सरपंच पतीची भर रस्त्यावर काठीने बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून मारहाण, बीड हादरले
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सगळा महाराष्ट्र हादरला होता. तसेच बीड मधील दहशतीचा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दाही समोर आला होता. आता पुन्हा एकदा बीडमध्ये एका उपसरपंचला बेदम मारहाण केल्याचा प्रसंग समोर आला आहे. याचा व्हिडिओत देखील व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात निपाणी टाकळी नावाचे गाव आहे, तिथे हा सगळा प्रकार घडला. उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निपाणी टाकळी येथील ग्रामसभेत उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी बोगस काम करून बिलं उचलू नका, असे आवाहन केले होते. या ग्रामसभेनंतर तू ग्रामसभेत बोगस कामासंदर्भात कसा काय बोलला? असा जाब विचारत सरपंच पती भगवान राठोड, जयकोबा राठोड आणि इतर ४ ते ५ जणांकडून माजलगाव-परभणी या रस्त्यावर उपसरपंच चव्हाण यांना काठी दगडाच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून यात काहीजण आणखी मार असे बोलताना दिसत आहेत. या मारहाणीत चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरु असून या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पण व्हायरल व्हिडिओच्या आधारे माजलगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान बीडमध्ये काही दिवसापूर्वी साक्षाळ पिंपरी गावात माजी सरपंच गोरख काशीद याने रस्त्याच्या वादातून एकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली होती.
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाण आणि हत्येनंतर बीडचे नाव संपूर्ण देशभरात गाजत असताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी सातत्याने चर्चेत आली आहे. अशातच माजलगाव – परभणी या रस्त्यावर उपसरपंच चव्हाण यांना मारहाण झाल्याने बीडची कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.