
हिट अँड रन प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक
२१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली, सीसीटीव्हीमुळे घटना उघडकीस, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
गुवाहाटी – अभिनेत्री नंदिनी कश्यपला गुवाहाटी पोलिसांनी अटक केली आहे. २१ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी नंदिनीला अटक करण्यात आली असून अभिनेत्रीवर हिट अँड रनचा आरोप आहे. इतकंच नाही तर आसामी अभिनेत्रीवर खून, निष्काळजीपणे गाडी चालवणे आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे.
अभिनेत्री नंदिनी कश्यपच्या भरधाव गाडीने २१ वर्षीय तरुणाला चिरडलं होतं ज्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. २५ जुलै रोजी २१ वर्षीय समीउल हक याला धडक देऊन त्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप नंदिनीवर आहे. नंदिनीने त्याला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. मंगळवारी रात्री जखमी झालेल्या समीउल हक याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही बातमी परसताच सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध नोंदवण्यात येऊ लागला. अखेर गोंधळानंतर गुवाहाटी पोलिसांनी नंदिनीला अटक केली. तसेच पोलिसांनी अभिनेत्रीची गाडीही जप्त केली आहे. आसाम पोलीस यापूर्वी हिट अँड रन प्रकरणात नंदिनीची चौकशी करत होते. समीउल हक हा गुवाहाटी महानगरपालिकेच्या टीमसोबत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होता. तो स्ट्रीटलाइट दुरुस्त करत असताना कश्यपच्या भरधाव बोलेरो एसयूव्हीने त्याला धडक दिली. ही बोलेरो नंदिनी कश्यप चालवत होती. गाडी खूप वेगाने जात होती आणि समीउलला धडकल्यानंतरही ती थांबली नाही. समीउलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि अनेक फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर नंदिनी थांबली नाही, तर गाडी घेऊन फरार झाली. समीउलचे मित्र तिचा पाठलाग करत काहिलीपारा परिसरातील अपार्टमेंटपर्यंत पोहोचले, जिथे नंदिनी गाडी लपवत असल्याचा आरोप आहे. त्यावेळी झालेल्या वादविवादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नंदिनी कश्यप ही आसामी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असून ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रुद्र’ या चित्रपटातील ‘सुरभी’ या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिचं मूळ नाव निकिता असून ती गुवाहाटीची रहिवासी आहे. सोशल मीडियावर तिच्या हजारो अधिक फॉलोअर्स असून, ती अनेक ब्रँड्स आणि इव्हेंट्समध्ये सक्रीय असते.