
माणुसकी मेली? पॅनिक अटॅक आलेल्या व्यक्तीला मारली थोबाडीत
धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, संतापाची भावना, विमानात नेमके काय घडले?
कोलकत्ता – माणुसकी संपली असे आजच्या कलियुगात बोलले जात आहे. अलीकडे लोक एखाद्या व्यक्तीला मदत करण्यापेक्षा फोटो आणि व्हिडिओ काढण्यात धन्यता मानत आहेत. त्यातच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कारण एका ह्रदयविकाराचा झटका आल्याला प्रवासाला वाईट अनुभव आला आहे.
इंडिगोच्या 6E-2387 फ्लाइटमध्ये पॅनिक अटॅक आलेल्या एका प्रवाशाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रवाशाला मदत करायचं सोडून सहप्रवाशानं त्याला जोरदार थोबाडीत मारली आहे, याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. विमानातून प्रवास करत असताना एका व्यक्तीला पॅनिक अटॅक आला. त्यावेळी त्याला मदतीची गरज होती. पण अशा प्रतिकूल परिस्थितीत दुसऱ्या एका प्रवाशानं त्याला थोबाडीत मारली. हे विमान मुंबईहून कोलकाताकडे जात होतं. दरम्यान, या विमानातून प्रवास करत असलेल्या ३२ वर्षीय हुसेन अहमद माजुमदार या प्रवाशाला पॅनिक अटॅक आला. त्यावेळी विमानातील क्रू मेंबर्स त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तेवढ्यात एक सहप्रवासी उठून उभा राहिला आणि त्यानं हुसेनला सणसणीत थोबाडीत मारली. विमान लँड झाल्यानंतर हुसेनला त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगोने या प्रकाराचा निषेध केला आहे. तसेच प्रवाशांनी सर्व नियमांचे पालन केले पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत.
हुसेनला थोबाडीत मारलेल्या व्यक्तीला CISF कडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला योग्य ती शिक्षा केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिले आहे.