
धक्कादायक! पत्नीची छेड काढल्यामुळे हतबल पतीची आत्महत्या
आत्महत्येपुर्वी व्हिडिओ करत सांगितली आपबीती या सहा जणांवर गंभीर आरोप, तुकारामसोबत काय घडले?
पुणे – पत्नीचा कंपनीत छळ होत असल्या कारणाने नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुकाराम ज्ञानेश्वर भाले असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ जारी केला होता. यात त्याने अनेक विषयांवर भाष्य केले.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गारुडीवस्ती परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या तुकाराम भाले यांच्या पत्नी लोणी काळभोर मधील इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीत काम करायच्या. या कंपनीतील व्यक्तीकडून तिचा छळ व्हायचा. फिर्यादी व त्यांचे पती तुकाराम भाले हे लोणी काळभोर येथील इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीमध्ये काम करत होते. तेव्हा आरोपी अक्षय केवट हा फिर्यादी यांना म्हणाला “तु मला आवडते, मला तुझ्यासोबत रिलेशन मध्ये राहायचे आहे, तुझ्या नवऱ्याला देखील काही कळणार नाहीं” असे म्हणुन फिर्यादी यांची छेडछाड करून अश्लील बोलायचा. तसेच कोणीही नसताना फिर्यादी यांच्यासोबत लगट करून विनयभंग केला. फिर्यादी व त्यांचे पती तुकाराम भाले यांनी या प्रकाराबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली. वरिष्ठांना तक्रार केल्याने सुपरवायझर अजित सिंग व सुनिल कसबे यांनी फिर्यादी यांना कामावरुन काढुन टाकले. त्यानंतर फिर्यादी यांचे पती तुकाराम भाले यांना सुध्दा कामावरुन काढुन टाकण्याची धमकी देवुन मानसिक त्रास दिला. आपल्या पत्नीसाठी काहीच करता येत नसल्या कारणाने ते हतबल झाले होते. या हतबलतेतून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तुकाराम भाले यांनी आत्महत्या करण्यापुर्वी एक व्हिडिओ देखील बनवला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही नाव घेतली होती. करण कसबे, सुनीता कसबे, सारीका कसबे, अजय सिंह अशी नावं घेतली असून, या व्यक्तींमुळे माझा कामधंदा गेला, माझं मोठं नुकसान झाले. माझा अख्खा पैसा देखील गेला. मला यांनी वाटेला लावले, असा आरोप करत तुकाराम भाले यांनी घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
तुकाराम भाले यांनी आत्महत्या केल्यानंतर भाले यांच्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून लोणी काळभोर मधील इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीच्या सुपरवायझरसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.