
सासरच्या त्रासाला कंटाळून रक्षाबंधनाला विवाहितेची आत्महत्या
वीस लाख रुपयासाठी विवाहितेचा छळ, शारिरिक आणि मानिसिक छळ असह्य, स्नेहाने उचलले टोकाचे पाऊल
पुणे – पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चर्चेत असतानात आता पुण्यातच सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. राखी पोर्णिमेदिवशीच विवाहितेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
स्नेहा विशाल झेंडगे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा यांचे विशाल झंडगे यांच्याशी गेल्या वर्षी २ मे २०२४ ला लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर स्नेहा आणि तिच्या सासरच्या मंडळींमध्ये अनेक वेळा वाद होत होते. फिर्यादी यांनी दिलेल्या पोलिसांना फिर्यादीनुसार, स्नेहा हिला स्वयंपाक नीट करता येत नाही, कंपनी चालवण्यासाठी तिने वीस लाख रुपये घेऊन यावे, तसेच इतर कारणासाठी स्नेहाचा सासरच्या मंडळींकडून अनेक वेळा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. स्नेहाने यापूर्वी पोलिसांत एक गुन्हा दाखल केला होता, मात्र सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दम देऊन तो गुन्हा मागे घेण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे स्नेहाचे मानसिक तणाव अधिकच वाढले. सातत्याने होणारा छळ, आर्थिक मागणी आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे ती पूर्णपणे खचली. अखेर ९ ऑगस्ट रोजी घरात कोणी नसताना स्नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेनंतर मयत स्नेहाचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी स्नेहाचा पती विशाल झंडगे, सासरे संजय झंडगे, सासु विठाबाई झंडगे, दीर विनायक झंडगे, नणंद तेजश्री थिटे, नंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.