
जमिनीच्या वादातून अख्ख्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकाचा खून
हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, 'सर्वांना डोळे, तोंड दाबून मारून टाका' म्हणत चाकूने सपासप वार
छत्रपती संभाजीनगर – घरासमोरील सिडकोच्या अतिरिक्त जागेवर कब्जा मिळविण्यासाठी राजकीय पाठबळ असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या कुटुंबाने निष्पाप व्यापाऱ्याच्या कुटुंबावर लाठ्या काठ्या, धारदार चाकूने प्राणघातक हल्ला चढवत एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात प्रमोद रमेश पाडसवान या तरुणाचा रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला, तर त्यांचे वडील रमेश पाडसवान व मुलगा रुद्राक्ष हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. निमोने कुटुंबियांनी ही हत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ वर्षांपासून संभाजी कॉलनीत वास्तव्यास असलेल्या पाडसवान कुटुंबाचे संताजी किराणा नावाने दुकान आहे. ज्ञानेश्वरने ३ वर्षांपासून पाडसवान यांच्या घरासमोरील सिडकोच्या अतिरिक्त जागेवर गणपती बसवणे सुरू केले. २ वर्षांपूर्वी पाडसवान कुटुंबाने दुकानासाठी हा प्लॉट रीतसर विकत घेतला. तेंव्हापासून निमोने आणि पाडसवान यांच्यात वाद होत होता. दोघांमधील वाद यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी पुन्हा उफाळून आले. काही महिन्यांपूर्वीच बांधकामाचे नियोजन केल्याने पाडसवान यांनी या जागेवर साहित्य आणून ठेवले होते. निमोनेने मात्र संपूर्ण प्लॉटवरच मंडळाचे स्टेज लावण्यासाठी हट्ट केला. दोन दिवसांपासून ते पाडसवान कुटुंबाला साहित्य काढण्यासाठी धमकावत होते. पाडसवान यांनी शुक्रवारी जेसीबीद्वारे साहित्य बाजूला करत गणेशोत्सवासाठी अर्धा प्लॉट देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, निमोनेला पूर्ण फ्लॅट हवा होता. पण तसे न झाल्याने निमोने यांनी पडसवाण कुटुंबावर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान सौरभ, ज्ञानेश्वर, गौरव या तिघा भावांनी वडील काशीनाथ, आई शशिकला आणि जावई मनोज दानवे यांच्यासह थेट घरासमोरच प्राणघातक हल्ला केला. शशिकलाने हातात चाकू देत ‘सर्वांना डोळे, तोंड दाबून मारून टाका’ असे भडकावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्येही स्पष्टपणे दोन्ही कुटुंबातील संघर्ष दिसून येतो. निमोने कुटुंबाने थेट चाकू आणि रॉडने हल्ला चढवत पाडसवान कुटुंबावर सपासप वार केले. यात प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी तत्काळ सौरभ, जावई मनोज, वडील काशीनाथला ताब्यात घेतले. गौरव, ज्ञानेश्वर, शशिकला यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.