
धक्कादायक! नराधम पतीने केली गर्भवती पत्नीची हत्या
हातपाय नदीत फेकले, धड घरात लपवले, त्या एका फोनमुळे झाला हत्येचा खुलासा, प्रेमविवाहाचा भयानक शेवट
हैदराबाद- तेलंगणातील हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पतीने आपल्या ५ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची अमानुषपणे हत्या केली आहे. ही घटना उघड झाल्यानंतर हैदराबादमध्ये खळबळ उडाली आहे.
बी. स्वाती असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. महेंद्र असे पतीचे नाव आहे. महेंद्र आणि बी. स्वाती यांचा जानेवारी २०२४ ला प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीचे दिवस आनंदात गेल्यानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. संशयामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली. धक्कादायक म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये स्वातीने विकाराबाद पोलिसांकडे पतीविरोधात हुंडाबळीची तक्रारही केली होती. पण नंतर हे प्रकरण मिटवण्यात आले. स्वाती पाच महिन्यांची गर्भवती असतानाही दांपत्यात भांडणे सुरूच होती. २२ ऑगस्ट रोजी स्वातीने माहेरी जाणार असल्याचे महेंद्रला सांगितले. ते ऐकून महेंद्र संतापला. त्याने २३ ऑगस्ट रोजी पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाचे कुऱ्हाडीने तुकडे करून डोके, हात, पाय नदीत फेकले, तर धड आपल्या खोलीत लपवून ठेवले. हत्येनंतर, महेंद्रने त्याच्या बहिणीला फोन करून सांगितले की त्याची पत्नी बेपत्ता आहे. त्यानंतर बहिणीला संशय आला आणि तिने एका नातेवाईकाला याबाबतची माहिती दिली, त्याने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर सगळे प्रकरण समोर आले. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. गोताखोरांच्या मदतीने नदीत टाकलेल्या मृतदेहांचे अवयव शोधले जात आहेत, परंतु अद्यापपर्यंत कोणतेही यश मिळालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधीच मुसी नदीत डोके, हात आणि पाय फेकून दिले होते, तर महिलेचे धड त्याच्या घरातून सापडले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.