
व्हाट्सअपवर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला, रविवारी भांडणानंतर व्हाट्सअप स्टेटस, गुरुवारी शेतात जीव घेतला, विद्यासोबत काय घडले?
परभणी – : ‘भावपूर्ण श्रद्धांजली’चा स्टेटस ठेवून पतीने पत्नीवर तब्बल १२ वार करून तिचा धारदार शस्राने खून केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील शेतशिवारात घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पती फरार झाला आहे.
विद्या विजय राठोड असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती विजय राठोड याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील विद्या हिचा वाघी येथील रहिवाशी विजय राठोड याच्याशी ८-१० वर्षापूर्वी विवाह झाला असून त्यांना दोन अपत्य आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाल्याने विद्या आपल्या माहेरी आली होती. दरम्यान गुरूवारी ती सोनापूर येथील त्यांच्या शेतशिवारात थांबली असता विजय राठोड त्या ठिकाणी आला. त्यानंतर त्याने तिच्यावर धारदार शस्राने तब्बल १२ वार केले. त्यामुळे आरडाओरड झाल्याने आजूबाजूचे शेतकरी देखील धावतपळत आले. सर्वांनी मिळून विद्याला जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पारवे यांनी विद्याला मृत घोषित केले. कमाल म्हणजे पत्नी विद्या राठोड भांडण करून माहेरी गेल्यानंतर तिचा पती विजय राठोड याने रविवारी स्वतःच्या मोबाईलवर विद्या राठोड हिचा फोटो ठेवून त्याखाली ‘भावपूर्ण श्रद्धांजली बायको’ असा मजकूर लिहिला होता. त्यानंतर विजयने बुधवारी ‘भांडण झाल्यावर लोक त्यांचा व्हॉट्सअप डीपी हटवतात, मी लोकांनाच हटवतो’ असं स्टेटस ठेवलं होतं. त्यामुळे हा खून पूर्वनियोजित असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शहराच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी करत केलेला आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. पोलिसांकडून आरोपी विजय राठोड हा घटनेनंतर फरारी असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.