
…तू जर आमदाराकडे गेलीस तर त्यांनाही गोळ्या घालून मारीन
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचा महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, तक्रारीचा इशारा देताच....
जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर एका महिलेसोबत लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होऊनही गुन्हा दाखल होऊ न शकल्याने खळबळ उडाली होती. पण अखेर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी निलंबनाची कारवाई करत त्यांच्यावर खातेअंतर्गत प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. २९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे, आमदार चव्हाण यांनी यावेळी एक ऑडिओ क्लिप सादर करत त्यातील संवाद ऐकवला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये आणि प्रशासनात खळबळ माजली होती. संदीप पाटील यांनी २०२३ साली एका गुन्ह्यात महिलेला मदत केली होती, त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. आमदार चव्हाण यांच्या मते, संदीप पाटील यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. पण त्यानंतर लग्नाला नकार दिला. तक्रार देण्याचा इशारा दिल्यानंतर, पाटील यांनी “एसपी, आयजी, डीजी मला काही करू शकत नाहीत. पालकमंत्री माझ्या खिशात आहेत,” अशी थेट धमकी दिली. इतकंच नव्हे तर “आमदारालाही गोळ्या घालून ठार मारेन” असा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचे आमदार चव्हाण म्हणाले आहेत. या आरोपांनंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र महिलेने ऐनवेळी तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला नाही. तरीही, या गंभीर आरोपांची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दखल घेत, सविस्तर अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला. त्यानंतर संदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान आमदार चव्हाण यांनी “एक पोलीस अधिकारी जर लोकप्रतिनिधींनाच गोळ्या घालण्याची भाषा करत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल उपस्थित केला आहे.
निलंबन काळात निरीक्षक पाटील यांची प्राथमिक चौकशी करण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कारवाई नंतर संदीप पाटील हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत.