
ट्विस्ट! माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांची आत्महत्या नसून हत्या?
गोविंद बर्गे प्रकरणात पुजाची मोठी कबुली, प्रकरणात राजकीय कनेक्शनचा दावा?, पूजाच्या दाव्यामुळे वेगळे वळण
बार्शी – गोविंद बर्गे या उपसरपंचाने केलेल्या आत्महत्येच्या घडामोडीला एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे. सुरुवातीला बर्गेच्या कुटुंबीयांनी नर्तकी पूजा गायकवाडवर गंभीर आरोप करत आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. आता पूजाने यात मोठे खुलासे केले आहेत.
पोलीस चौकशीत पूजाने गोविंद बर्गेसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण प्राप्त झाले आहे. पूजा गायकवाडच्या घरासमोर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली तेव्हा पूजा गायकवाड ही सासुरे गावात नसल्याची माहिती समोर येत आहे. पूजा गायकवाड ही पारगाव येथील कला केंद्रात रात्रभर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूजा गायकवाडचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद बर्गे गेवराईवरून तिला शोधत बार्शी तालुक्यातील वैराग या ठिकाणी आले. तेथे आल्यावर गोविंद यांनी पूजाला अनेक फोन कॉल्स केले होते. गोविंद बर्गे यांचा भाच्याने म्हटले की, माझा मामा हा निर्व्यसनी होता आणि त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते. माझ्या मामाकडे कधी बंदूक नव्हती. हा काहीतरी मोठा कट असून माझ्या मामाला फसवण्यात आले. मुळात म्हणजे मामा हा मागील सहा महिन्यांपासून प्रचंड तणावात होता. माझ्या मामाची आणि पूजा गायकवाडची ओळख राजकीय लोकांनीच करून दिली होती. चित्र वेगळी दाखवले जात आहे, असा दावा केला आहे. यासोबतच गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांकडून असेही सांगितले जात आहे की, ही आत्महत्या नसून ही हत्याच आहे. गोविंद कधी काठीहीसोबत ठेवत नव्हता. मग बंदूक कशी आली, हा देखील प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणी बार्शी न्यायालयाने पूजा गायकवाड हिला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
बीड येथील माजी उपसरपंच आणि प्लॉटिंग व्यवसायातून पैसा कमावणारे गोविंद बर्गे हे कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमात अडकले आणि लग्न झालेलं असूनसुद्धा तिच्यावर त्यांनी पैसा उधळला. मोबाईल, मोटरसायकल, प्लॉट, सोन्याचे दागिने अशा अनेक भेटवस्तू तसेच लाखो रुपयेसुद्धा तिच्यावर त्यांनी खर्च केले. पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडून अनेक गोष्टींची मागणी केल्याने त्या दोघांमध्ये वादाचा खटका उडाला होता.