
भयानक! पाणी पिण्यास मागितले आणि केले धक्कादायक कृत्य
दोन तरुणांचे वयस्कर महिलेबरोबर थरकाप उडवणारे कृत्य, घटना सीसीटीव्हीत कैद, नेमके काय घडले?
नाशिक – नाशिक शहरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. दिवसाढवळ्या चोर घरात घुसून कसे चोरी करतात, हे या व्हिडीओतून समोर आलं आहे. पंचवटीतील रामवाडी परिसरात एका महिलेच्या घरात घुसून दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील ३ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली आहे.
या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नंदिनी नारायण नायक या खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात. शुक्रवार (दि.१२) रोजी नियमित प्रमाणे कामकाज उरकून चार ते पाच वाजेच्या दरम्यान दळणाचा डबा घेऊन राहते घरी पोहचल्या. घरामध्ये दळणाचा डबा व हातातील पिशवी ठेवली. यावेळी दोन अज्ञात संशयितांनी त्यांना पत्ता विचारला आणि पिण्यासाठी पाणी मागितले. नायक यांनी त्या दोघांना पिण्यासाठी पाणी दिले, त्यानंतर त्यातील एका संशयिताने नंदिनी नारायण नायक यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. नायक यांनी त्यास विरोध केला. मात्र, त्याने अर्धी सोनसाखळी घेऊन पोबारा केला. नंदिनी नायक यांनी ही बाब तातडीने त्यांच्या मुलीला सांगितली आणि त्यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.