
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना लाथा बुक्क्या आणि काठीने बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, मारहाणीत चार पत्रकार गंभीर जखमी, ठेकेदारही मग्रूर, नेमके काय घडले?
त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना गुंडांनी मारहाण केल्याची अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींसह अन्य तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या घटनेबद्दल संताप व्यक्त होत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे.
मारहाणीची घटना त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथे वाहनांच्या प्रवेशासाठी बेकायदेशीरपणे पावती शुल्क वसूल केले जात होते. ही वसुली काही गुंड प्रवृत्तीची मुले करत होती. पत्रकार योगेश खरे यांच्यासह इतर काही पत्रकार कुंभमेळ्याच्या संदर्भात साधुमहंतांच्या बैठकीसाठी त्र्यंबकेश्वरला जात होते. त्यांना वेळेवर पोहोचायचे असल्यामुळे ते लवकर निघाले होते. मात्र, रस्त्यात वसुली करणाऱ्या या मुलांनी त्यांची गाडी अडवली. पत्रकारांनी आपण पत्रकार असून तातडीच्या कामासाठी जात असल्याचे सांगितल्यावरही या मुलांनी त्यांना गाडी पुढे नेण्यास मनाई केली. उलट त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली. हा वाद वाढत गेल्याने योगेश खरे यांनी संबंधित ठेकेदाराशी फोनवर संपर्क साधला. मात्र, ठेकेदारानेही सहकार्य करण्यास नकार दिला आणि कोणत्याही परिस्थितीत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यातून वाद वाढला आणि त्या वसुली करणाऱ्या गुंडांनी किरण ताजने, योगेश खरे आणि अभिजित सोनवणे यांना छत्री, काठी आणि दगडाने मारहाण करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने पुरावे उपलब्ध आहेत. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे. पत्रकारांना मारहाण करण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय असून पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि गुंडांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस प्रशासनावर आणि ठेकेदाराच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्र्यंबकेश्वर येथे चार ते पाच पत्रकारांवर झालेल्या अमानुष मारहाणीची घटना समोर समजताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.