
तो स्क्रीनशॉट पाठवत प्रसिध्द अभिनेत्रीची मोठी फसवणूक
अभिनेत्रीने व्हिडिओ बनवत दिली माहिती, कलाकारांना आणि नागरिकांना केले आवाहन, स्क्रीनशॉटमध्ये काय होते, काय घडले?
मुंबई – अलीकडे फसवणूक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण आता सामान्य नागरिकांपेक्षा सेलिब्रिटी यांना लक्ष्य करण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. ‘देवमाणूस’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री अस्मिता देशमुख एक फसवणूकीची घटना समोर आली आहे.
अभिनेत्री अस्मिता देशमुख अलीकडेच आर्थिक फसवणुकीची शिकार झाली आहे. स्वतः अस्मिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या घटनेबाबत माहिती दिली असून तिच्या व्हिडिओनंतर मोठी खळबळ उडाली आहे. अस्मिता देशमुखला या कार्यक्रमासाठी इव्हेंट मॅनेजर सुजित सरकाळे यांनी संपर्क साधला होता. नेहमीप्रमाणे, कलाकार जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावतात तेव्हा मानधनाची खात्री करून घेतात. अस्मिताने देखील तशी खात्री मागितली होती. त्यावर आयोजकांकडून तिला मानधन दिल्याचा एक स्क्रीनशॉट पाठवला. या स्क्रीनशॉटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याचे दाखवले गेले होते. मात्र प्रत्यक्षात तिच्या बँक खात्यात एक रुपयाही जमा झाला नव्हता. परंतु अनेकदा समजावून सांगूनही पैसे मिळाले नाहीत. शेवटी तिने या प्रकरणाची पोलिसांत तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांकडे तक्रार करूनही काहीच झाले नाही. एक व्हिडिओ करत अस्मिता म्हणाली की, मध्यंतरी मी एका दहिहंडीच्या इव्हेंटला गेले होते आणि हा इव्हेंट मला दिला होता सुजित सरकाळे याने…आणि माझ्याबरोबर अन्य काही सेलिब्रिटी सुद्धा या इव्हेंटला आले होते. इव्हेंटला जाण्याआधी त्याने मला पैसे पाठवल्याचे काही स्क्रीनशॉट पाठवले होते. स्क्रीनशॉटमध्ये मला दिसत होतं की पैसे आलेत…पण, माझ्या अकाऊंटमध्ये ते पैसे आलेच नव्हते. त्यामुळे त्याने मला कारणं दिली की, सर्व्हर डाऊन आहे, बँकेची समस्या आहे. तर, मी म्हणाले ठिके चला येतील पैसे…एक-दोन दिवस झाले…असाच आठवडा झाला. त्यानंतर मला एक खूप मोठी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे माझ्याबरोबर खूप मोठा स्कॅम घडलेला आहे. असाच स्कॅम इतरांच्या बाबतीतही घडू शकतो. मी सर्वांना कळकळीची विनंती करते की, सुजित सरकाळे या माणसाबरोबर पुन्हा कधीच इव्हेंट करू नका किंवा इव्हेंटला जायच्या आधी पूर्ण पैसे घ्या. पैसे अकाऊंटमध्ये जमा झालेत की नाही याची खात्री करा आणि मगच इव्हेंटला जा, असे आवाहन देखिल अस्मिताने केले आहे.
इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करताना अभिनेत्री अस्मिताने संबंधिताचा फोन नंबर आणि इन्स्टाग्राम आयडी सुद्धा मेन्शन केला आहे. दरम्यान तिच्या या अनुभवामुळे पुन्हा एकदा कलाकारांच्या आर्थिक सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.