
निवडणुकीसाठी ३ कोटी खर्च, जेवणावळीसाठी १०० बोकड कापावी लागतात
शिंदे गटाच्या आमदाराचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, महायुती आणि निवडणूक आयोग अडचणीत?, काय झाले?(Video)
बुलढाणा – बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेत होणारा प्रचंड खर्च आणि कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला आहे. पण यामुळे महायुती आणि निवडणूक आयोग अडचणीत आले आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या निवडणुका आता सोप्या राहिलेल्या नाहीत. एक-दोन ते तीन कोटी रुपये खर्च करावे लागतात. काही ठिकाणई जेवणावळीसाठी 100-100 बोकडं कापावी लागतात. या खर्चामुळे कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो. त्यामुळे एवढे पैसे खर्च करून मातीत जायचं का? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला. संजय गायकवाड पुढे म्हणाले की, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की, जे धोरण चिखलीचे ठरेल, जे मलकापूरचे ठरेल ते धोरण जर बुलढाणा ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत, असे म्हणत युतीसाठी हात पुढे केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर याची चर्चा अजून सुरूच आहे. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे युतीबाबत अनिश्चिती आहे. माजी आमदार सदा सरवणकर यांनी निधीबाबत केलेल्या विधानानंतर राज्यात वादाला तोंड फुटले आहे. अशातच आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकींसाठी ३-३ कोटींचा खर्च येत असल्याचे मोठे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
गायकवाड यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ज्याला जशी सवय, तशी वक्तव्ये. त्यांना खोके आणि बोक्यांची सवय लागलेली आहे. संजय गायकवाड सत्य बोलतात आणि सत्य करतात. तीन कोटी रुपये आणि शंभर बोकडे… किती बोकडं पोसून ठेवली आहेत आणि किती कोटी जमा केले आहेत? किती कोटी देणार आणि किती बोकडे देणार, यावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहावे लागेल, असे म्हणाले आहेत.