
मुख्यध्यापकाची शिक्षण अधिकाऱ्यांला बेल्टने बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल, चौकशी सुरू असताना केली मारहाण, त्या पत्रामुळे उडाली खळबळ
लखनऊ – सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षण अधिकाऱ्याला त्यांच्याच कार्यालयात बेल्टने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात घडलेली ही घटना ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
ब्रिजेंद्र वर्मा असे मारहाण करणाऱ्या मुख्यध्यापकाचे नाव आहे. ते सीतापूर जिल्ह्यात असलेल्या महमूदाबाद परिसरातील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. वर्मा हे त्याच शाळेतील एक शिक्षकाला त्रास देत असल्याची तक्रार मूलभूत शिक्षण अधिकारी (बीएसए) अखिलेश प्रताप सिंह यांच्याकडे दाखल करण्यात आली होती. सिंह यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्याध्यापक वर्मा यांना कार्यालयात बोलवले होते. अखिलेश सिंह यांनी मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक दोघांनाही समोरासमोर बोलावून चौकशी सुरू केली. पण यामुळे संतापलेल्या वर्मा यांनी आपला बेल्ट काढत सिंह यांना मारहाण करण्यात सुरुवात केली. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून वर्माला रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून याचे पडसाद मोठया प्रमाणात उमटत आहेत.
आरोपी ब्रिजेंद्र वर्मा यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या चौकशीवेळी बुधवारी हा प्रकार घडला. हल्ल्यानंतर अधिकाऱ्याने तक्रार केली, त्यानुसार आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे.