
भयंकर! पुण्यात चक्क पोलिसावरच कोयत्याने हल्ला
पुण्यात चाललंय काय? हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी, यामुळे पोलिसावर केला हल्ला
पुणे – राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात मागील काही काळापासून गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. गोळीबार, कोयता गॅंग यामुळे नागरिक असुरक्षित होते. पण आता पुण्यात चक्क पोलीसच सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. कारण, ड्यूटी संपवून घरी जात असताना पोलिसावर दोघांनी कोयत्याने वार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
अमोल काटकर असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पुण्यातील लॉ कॉलेजरोडवर ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार कट मारल्याच्या वादात हा प्रकार घडला आहे. गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल काटकर हे ड्यूटी संपवून घरी परतत असताना, बाईकवर आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात काटकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा हल्ला रस्त्यावरील ‘कट मारणे’ या किरकोळ वादातून झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. पण थेट पोलिसांवर हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.