
धक्कादायक! ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने संपवले जीवन
अभ्यास करण्यासाठी खोलीत गेली आणि सारेच संपले, पोलिसांकडून मोबाईल जप्त, साक्षीने टोकाचा निर्णय का घेतला?
सोलापूर – एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोर घडली आहे.
साक्षी सुरेश मैलापुरे असे मृत युवतीचे नाव आहे. साक्षी सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सोलापूरच्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस साक्षीचा मोबाईल जप्त करणार असून त्यामधून अधिकची माहिती समोर येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साक्षी मैलापूरे ही मंगळवारी सकाळी अभ्यास करण्यासाठी आतल्या खोलीत गेली होती. बराच वेळ झाला आतून बाहेर आली नाही. तिच्या आईने दरवाजा ठोठावला पण आतून काहीही आवाज आला नाही. तिच्या मोबाईलवर कॉल करूनही ती उचलत नव्हती. त्यावेळी घाबरलेल्या तिच्या आईने नातेवाईकांना व शेजारच्यांना बोलावून घेतले. दरवाजा उघडताच साक्षीने खोलीतील पंख्याच्या हुकला स्कार्फने गळफास घेतल्याचे दिसले. गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आईच्या पायाखालची जमीन सरकली. नातेवाईकांनी व शेजाऱ्यांनी साक्षीला बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. साक्षीची पूर्वपरीक्षा संपली होती, साक्षी अभ्यासातही हुशार होती. दरवर्षी मुख्य परीक्षेपूर्वीची विद्यार्थ्यांची कॉलेजतर्फे पूर्वपरीक्षा दिवाळीपूर्वी घेतली जाते. मेडिकलच्या तिसऱ्या वर्षाला दोनच विषय असतात. साक्षी अभ्यासात हुशार होती, दोन्ही वर्ष ती चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. तिने आत्महत्या का केली? हे अजूनही अस्पष्ट आहे. पोलिस आत्महत्या का केली यामागील कारणांचा शोध घेत आहेत. त्यासाठी साक्षीचा मोबाईल जप्त केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
साक्षी ही अभ्यासात हुशार होती. तिने एवढ्या कमी वयात असा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अनेक तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. साक्षीच्या मृतदेहावर मूळ गावी जत येथे अंत्यसंस्कार पार पडले.