
प्रियकरासोबत मुलगी पळून गेल्यानंतर वडिलांनी केलेल्या कृतीची चर्चा
गावात मोठमोठे बॅनर लावत गावकऱ्यांना दिले आमंत्रण, गावकारीही चकित, सुष्मीताच्या वडिलांनी काय केले?
बेळगाव – वडिलांनी चक्क जिवंत मुलीचे श्राद्ध घातल्याची घटना बेळगाव जिल्ह्यामधील रायबाग तालुक्यात घडली आहे. मुलीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी मुलीचे श्राद्ध घातले आहे. याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.
सुष्मिता शिवगौड पाटील ही तिचा प्रियकर विठ्ठल बस्तवाडे याच्यासोबत पळून गेली होती. मुलीच्या या कृत्यामुळे घराण्याचा नावलौकिक डागळला. या रागापोटी वडील शिवगौडा पाटील यांनी मुलीची तिथी आयोजित करून कुटुंबीयांसह पै पाहुणे व गावकऱ्यांना मुलीच्या नावाने श्राद्धाचे जेवण घातले. इतकेच करून पित्याचा राग शांत झाला नाही तर त्यांनी गावात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे फलक लावून मुलीला श्रद्धांजली अर्पण केली. रायबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेची पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू आहे. विठ्ठल हा तहसील कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. तर सुष्मिता ही तिच्या कुटुंबातील चार बहिणींपैकी सर्वात धाकटी आहे. सुष्मिता आणि विठ्ठल यांनी एकमेकांवरील प्रेमामुळे पळून जाण्याचा निर्णय घेतला. शिवगौड पाटील यांनी गावकऱ्यांना आणि नातेवाईकांना बोलावून सुष्मिताचा फोटो ठेवून पूजन केले. त्यानंतर एखाद्या मृत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करावी, अशा पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करत भोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या विधीत त्यांनी कुटुंबातील सर्व नातेसंबंध तुटल्याचं आणि मुलीला घरातून बेदखल केल्याचं देखील जाहीर केलं. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी घरासमोर भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर लावला. मुलगी जिवंत असतानादेखील बापाने तिचं श्राद्ध घातल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
वडिलांकडूनच मुलीचे जिवंतपणे श्राद्ध ही घटना रायबाग पोलिस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रात घडली असून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. अनेकांनी पालकांच्या वेदनेशी सहानुभूती व्यक्त केली असली, तरी काहींनी अशा टोकाच्या कृतीला विरोध होत आहे.