
विवाहित महिलेसोबत लग्नाला विरोध झाल्याने तरुणाची आत्महत्या
व्हॉट्सॲपवर भावनिक संदेश ठेवत रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या, त्या कारणाने होता नैराश्यात, म्हणाला पल्लवी… तुला माझं प्रेम....
परभणी – परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंधात आलेल्या नैराश्यामुळे एका तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावनिक संदेश ठेवून तो नातेवाइकांनाही पाठविला होता.
माणिक कारभारी खोसे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणिक खोसे याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. संबंधित महिला पतीच्या छळाला कंटाळून माहेरी राहू लागली होती. या काळात माणिक आणि त्या महिलेमधील संबंध अधिक दृढ झाले आणि अखेर विवाहापर्यंत पोहोचले. मात्र, या नातेसंबंधाला नातेवाइकांकडून तीव्र विरोध होऊ लागला. या विरोधामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या माणिक खोसे यांनी रविवारी रात्री रवळगाव शिवारात धावत्या रेल्वे रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी विराटने मोबाईलवर ‘माझा लास्टचा मेसेज आहे. गुड बाय.. पल्लवी… तुला माझं प्रेम, माझा जीव गेल्यावरच कळेन. माझ्या जिवाला काही झालं तर त्याला जबाबदार पल्ल्वी राहिल. तीन वर्षानंतर ती माझ्या लाईफमध्ये आली. मी तिच्या लाईफमध्ये आलो नाही. पण काय करू लय प्रेम करतो मी तिच्यावर, त्यामुळं मला लय टेन्शन येतंय. पल्लवी तू टेन्शन घेऊ नको. मी मुलगी नाही, मुलगा आहे म्हणून माझ्या जीवाला काही झालं तरी कुणी येणार नाही. मुलगी असतो तर सगळ्यांनी उठाव केला असता. पण तुला मुलगा झाला तर माझं नाव त्याला ठेव. तुला विराट तुला लय आवडतंय ना… मुलगी जर झाली तर स्वामीज्ञा मला हे नाव लय आवडतय. मी जीव दिल्यावर कुणाला वाईट वाटणार नाही. फक्त माझ्या आई-वडिलांना दु:ख होईल. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे ना… माझा अॅक्सिडेन्ट झाला तेव्हाच मी मरायला पाहिजे होतं. तीन वर्ष मला आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद… माझा आणि तुझा फोन माझ्याजवळ आहे. त्याच सगळं काही आहे. हाईड फोटो पण त्यात आहे बघ, असे स्टेटस ठेवत आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व कायदेशीर पंचनामा केला. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.