
अभ्यासाचा ताण आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या युवतीवरील प्रेमाला विरोध होण्याच्या ताणातून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या मुलाने आपल्या ताणाची कबुली देणारी चिठ्ठी लिहून आत्महत्येपूर्वी ती वडिलांना व्हॉट्स ॲपवर पाठवली होती. संबंधित मुलगा मूळचा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आहे.

साताऱ्याजवळ वसतिगृहात राहून तो शिक्षण घेत होता. शुक्रवारी तो दिवाळी सुट्टी संपवून परत वसतिगृहात आला. मात्र, त्याने दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री चिठ्ठी लिहून ती वडिलांच्या व्हॉटसॲपवर पाठवली. वडिलांनी ती दुसऱ्या दिवशी वाचली. त्या वेळी त्यांना धक्का बसला. कॉलेजवर फोन करून माहिती घेतली असता, त्यानंतर ही घटना समोर आली.

मृत मुलाला बहीण असून, तिचे एका मुलावर प्रेम आहे. मात्र, कुटुंबीयांकडून मुलीच्या प्रेमाला विरोध आहे. अशातच या मुलाचेही त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या युवतीवर प्रेम जडले होते. कुटुंबीयांकडून आपल्या प्रेमालाही बहिणीप्रमाणेच विरोध होईल, अशी भीती त्याला वाटत होती. त्याचबरोबर अभ्यासाचा ताण यातून मुलाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा तालुका पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. हवालदार किरण निकम तपास करीत आहेत. अवघ्या १७ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली.


