…म्हणून हा बाबा सकाळीच मंत्रालयात येऊन बसायचा
अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत 'या' आमदाराची जोरदार टिका
जळगाव दि २०(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कारणांमुळे ‘मातोश्री’वर थांबायचे पण अजित पवार पहाटेच मंत्रालयात यायचे,आणि सर्व निधी, योजना आणि कामं पळवायचे अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. ते जळगावात एका सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख केला आहे.
महविकास आघाडी स्थापनेचा घटनाक्रम सांगताना शहाजीबापू म्हणाले की, “२०१९ च्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत सर्व काही ठीक होतं. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार येणार होते. पण अचानक आम्हाला एका हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं. तेथून दुसऱ्या हॉटेलमध्ये नेलं, मग तिसऱ्या हॉटेलमध्ये नेलं, त्यामुळे आम्हालाच वाटायला लागलं की, आम्ही आमदार आहोत की कोण आहोत? पण महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार आहेत म्हटल्यावर आम्ही ते मान्य केले.पण पुढच्या अडीच वर्षात आम्हाला चांगला अनुभव आला नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर थांबायचे. तो अजित पवार पहाटेच मंत्रालयात येऊन बसायचा. अकरा वाजता मंत्रालय उघडायचं आणि हा बाबा सकाळी साडे सातलाच मंत्रालयात येऊन बसायचा. या काळात राष्ट्रवादीने सगळा निधी नेला, त्यांनी सगळी कामं नेली, सगळ्या योजना नेल्या. आम्ही मात्र मुख्यमंत्र्यांचे आमदार म्हणून मंत्रालयाच्या परिसरात तोंड बारीक करून हिंडत बसायचो. म्हणूनच आम्ही बंड केले असे सांगत त्यांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे.
एकनाथ शिंदे आणि आम्ही केलेले बंड हे शिवसेनेच्या भल्यासाठी रक्षणासाठीच आहे असा दावाही शहाजीबापूंनी केला आहे. जर आम्ही आजही त्यांच्याबरोबर राहिलो असतो तर शिवसेना पुढच्या निवडणूकीपर्यंत संपली असती असा दावाही पाटलांनी केला आहे.आता राष्ट्रवादी याला काय प्रत्युत्तर देणार हे पहावे लागेल.